पिरंगुट: अचानक आलेल्या वादळी वार्यामुळे कोलाड महामार्गावर असलेल्या मुळशी तालुक्यातील भुकूम येथील शेल पेट्रोल पंपाजवळ दोन महाकाय होर्डिंग वार्यामुळे पडल्या. नशीब बलवत्तर म्हणून होर्डिंगखाली फक्त गाड्या लावलेल्या होत्या आणि नागरिक पाऊस आल्यामुळे शेजारील हॉटेलमध्ये थांबलेले होते.
हे दोन होर्डिंग जर विरुद्ध दिशेला पडल्या असत्या, तर मोठी जीवितहानी झाली असती. या ठिकाणी असलेल्या छोट्या टपर्या होर्डिंगखाली दबल्या. त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. हे दोन्हीही होर्डिंग जुन्या झालेल्या होत्या. ज्या वेळी पावसाळा सुरू होतो त्या वेळी होर्डिंग रिकामे करणे गरजेचे होते. (Latest Pune News)
परंतु, काही राजकीय लोकांनी स्वतःच्या प्रसिद्धीच्या हव्यासापोटी लावलेले हे होर्डिंग वार्याच्या प्रचंड दबावापुढे तग धरू शकल्या नाहीत आणि खाली पडल्या. होर्डिंग ज्या ठिकाणी पडल्या ते ठिकाण अत्यंत वर्दळीचे असून, त्या ठिकाणी अनेक खाद्यपदार्थ विक्री करणारे हॉटेल आहेत.
त्यामुळे भुकूममधील सर्वाधिक वर्दळीच्या ठिकाणी दोन होर्डिंग पडल्या. घटना घडल्यानंतर तत्काळ बावधन पोलिस त्या ठिकाणी हजर झाले तसेच कोणी जखमी झाले आहे का? हे पाहून पुढील कारवाई करण्यात आली.
होर्डिंग पडल्यानंतर तातडीने ते वेल्डिंगच्या साह्याने कट करून तसेच भली मोठी क्रेन आणून बाजूला करण्यात आली. पीएमआरडीएच्या आकाशचिन्ह विभागाकडे संबंधित होर्डिंगमालकाने परवानगीसाठी अर्ज दाखल केले असल्याचे सांगितले.