Ajit Pawar Research Center Pudhari
पुणे

Ajit Pawar Research Center: पुण्यात ‘अजितदादा पवार देशी गाय संशोधन केंद्र’चे उद्घाटन; महिला प्रशिक्षणालाही चालना

देशी गाय संशोधन, आधुनिक पशुपालन आणि महिला शेतकरी प्रशिक्षणाला नवे बळ; सुनेत्रा पवार यांची सूचना

पुढारी वृत्तसेवा

पुणे: कृषी आणि पशुसंवर्धन क्षेत्रातील संशोधन, प्रशिक्षण व आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार अधिक प्रभावीपणे व्हावा, या उद्देशाने येथील शासकीय कृषी महाविद्यालयांतर्गत कार्यरत देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राला उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे नाव देण्यात आले आहे. हा निर्णय राज्यातील शेतकरी, पशुपालक आणि विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केले. दूध व्यवसायात महिलांचे अनन्य साधारण महत्त्व असून, या केंद्रात महिला शेतकऱ्यांचे निवासी प्रशिक्षणदेखील सुरू करण्याची सूचना त्यांनी कुलगुरूंना केली.

राहुरीतील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या पुण्यातील शिवाजीनगर येथील कृषी महाविद्यालयातील देशी गाय संशोधन केंद्राचे नामकरण करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. त्यानुसार ‌‘अजितदादा पवार देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र‌’ असे नामफलकाचे अनावरण शुक्रवारी (दि.15) त्यांच्या हस्ते सायंकाळी करण्यात आले. त्या वेळी त्या बोलत होत्या. त्यांनी देशी गाय प्रकल्पासह कृषी महाविद्यालयाच्या कामाचाही आढावा घेतला.

या वेळी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे, संशोधन संचालक डॉ. प्रशांत बोडके, कृषी अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे, कृषी विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे, पुणे कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सुभाष भालेकर आणि देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सोमनाथ माने व अन्य मान्यवर उपस्थित होते.

कुलगुरू डॉ. विलास खर्चे म्हणाले, ‌‘राज्य शासनाच्या सहकार्याने विकसित केलेले हे देशी गाय संशोधन केंद्र ग््राामीण भागातील पशुपालकांसाठी मार्गदर्शक ठरत आहे. आधुनिक पशुपालन तंत्रज्ञानाचा प्रसार, उत्पादनक्षमता वाढ आणि शाश्वत शेती व्यवस्थेला चालना देण्याचे कार्य सुरू आहे. या केंद्रामुळे विद्यार्थ्यांना अनुभवाधारित शिक्षणाची संधी उपलब्ध झाली असून, संशोधन आणि विस्तार कार्याला नवे बळ मिळणार आहे.

आठवणीतील दादां‌’ची छायाचित्रे पाहून थबकली पावले...

कृषी महाविद्यालयातील देशी गाय संशोधन प्रकल्प हा माझा ड्रीम प्रोजेक्ट आहे. त्याला कधीही निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार हे प्रत्येक वेळच्या कार्यक्रमात येथे म्हणत आणि त्यासाठी राज्य सरकारतर्फे 72 कोटींचा निधीही मंजूर करून प्रकल्प कार्यान्वित केला आहे. कार्यक्रमाच्या प्रवेशद्वारावर दुतर्फा ‌‘आठवणीतील दादा‌’ या शीर्षकाखाली विविध छायाचित्रांच्या पोस्टरद्वारे कृषी महाविद्यालयाने एक प्रकारे त्यांच्या स्मृती जपल्या. त्यामुळे उद्घाटनापूर्वीच सर्व जणांची पावले तेथेच थबकल्याचे दिसून आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT