माळेगावात अजित पवार विजयी  pudhari
पुणे

Malegav Election Result: ‘माळेगाव’च्या रणांगणात उपमुख्यमंत्रीच ठरले दादा

अण्णा-काकांना मतदारांनी नाकारले; शरद पवार गटाचाही करिश्मा नाही

पुढारी वृत्तसेवा

राजेंद्र गलांडे

बारामती : राज्याचे लक्ष लागलेल्या व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीत पवार यांच्या श्री निलकंठेश्वर पॅनेलने निर्विवाद बाजी मारली. ज्येष्ठ सहकार नेते चंद्रराव तावरे, रंजनकुमार तावरे यांच्या सहकार बचाव शेतकरी पॅनेलला मतदारांनी साफ नाकारले. राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार गटाला आपला कोणताही प्रभाव निवडणुकीत दाखवता आला नाही. पण, त्यांचा फटका तावरेंच्या पॅनेलला काहीअंशी बसला. माळेगावच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत आपणच दादा असल्याचे सिद्ध केले.

माळेगावच्या निवडणुकीत चार पॅनेल समोरासमोर उभे ठाकले. त्याचा फायदा उपमुख्यमंत्र्यांच्या निलकंठेश्वर पॅनेललाच झाल्याचे निवडणूक निकालातून दिसून आले. निवडणूकपूर्व युती-आघाडी झाली असती तर वेगळे चित्र दिसले असते. परंतु मतदार आपल्याला नाकारतील अशी कणभरही शंका तावरे गुरू-शिष्यांच्या मनात आली नाही. त्यातून त्यांचा घात झाला. उपमुख्यमंत्री पवार यांनी माझे पॅनेल सर्वपक्षीय असेल असे जाहीर करत कवाडे उघडी ठेवली होती, परंतु अपेक्षित वाटाघाटी झाल्याच नाहीत. शरद पवार गटाकडूनही अजित पवार गटाकडे काही जागांची मागणी केल्याचे बोलले जात होते, परंतु अपेक्षित जागा पदरात न पडल्याने त्यांनीही स्वतंत्र पॅनेल उभे केले, शेतकरी-कष्टकरी समिती निवडणूक लढविण्यावर ठाम राहिली. त्यातून तावरे गुरू-शिष्याची गोळाबेरीज यंदा कमालीची चुकली. विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण होऊ असा आत्मविश्वास त्यांना होता. परंतु ते काठावर सुद्धा उत्तीर्ण होऊ शकले नाहीत. थेट नापास होण्याची वेळ त्यांच्यावर आली.

माळेगावची निवडणूक तशी रंजक झाली. उपमुख्यमंत्री पवार हे पॅनेल उभे करतील, हे निश्चित होते. परंतु ते स्वतः निवडणूक लढवतील हे सभासदांच्या ध्यानीमनीही नव्हते. त्यांनी ब वर्गातून अर्ज दाखल करत विरोधकांवरील दडपण वाढवले. त्यापुढील टप्प्यात त्यांनी माळेगावचा पुढील पाच वर्षे अध्यक्ष मीच असेल असे जाहीर केले. तेथून निवडणुकीचे वारे 360 अंशात फिरले. पवार यांची आर्थिक शिस्त, प्रशासनातील दांडगा अनुभव, केंद्र-राज्य सरकारकडून विविध माध्यमातून ते खेचून आणू शकणारा निधी, राज्यात पहिल्या पाच कारखान्यांतील दर तुम्हाला मिळेल, हे दिलेले आश्वासन सभासदांना भावले. त्यातून सभासदांनी त्यांना भरभरून साथ देत निलकंठेश्वर पॅनेलला निर्विवाद बहुमत मिळवून दिले. माळेगावच्या चेअरमनपदाची खुर्ची पवार यांच्याकडेच राहणार असल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले. अर्थात त्यासाठी उपमुख्यमंत्री पवार यांनी आठवडाभर बारामतीत तळ ठोकला. गावोगावी सभा घेतल्या. अनेक सभासदांच्या वैयक्तिक गाठीभेटी घेत नाराजी दूर केली. त्याचा परिणाम त्यांना मोठ्या विजयापर्यंत घेऊन गेला.

तावरे यांना या निवडणुकीत भाजपकडून अपेक्षित मदत मिळाली नाही. बारामतीत दादांशी पंगा नको, या भूमिकेत भाजपचे नेते गेल्याने त्याचाही परिणाम प्रचारयंत्रणेवर झाला. याउलट उपमुख्यमंत्र्यांनी सक्षम यंत्रणा उभारली. सोमेश्वर, छत्रपती कारखान्यासह जिल्हा बँक, बारामती बँक, दूध संघ, बाजार समिती, खरेदी-विक्री संघाच्या पदाधिकारी-संचालकांना कामाला लावले. ही निवडणूक त्यांनी एक आव्हान म्हणून स्वीकारली आणि ती यशस्वीही करून दाखवली. उपमुख्यमंत्र्यांनी माळेगाव एकतर्फी ताब्यात घेत तावरे गुरू-शिष्यांसह शरद पवार गटालाही जोरदार धक्का दिला.

शरद पवार गटाला विधानसभेनंतर हा दुसरा मोठा फटका बसला. खा. सुप्रिया सुळे, युगेंद्र पवार यांनी प्रचाराची धुरा सांभाळली. परंतु त्यांच्या पॅनेलला सभासदांनी साफ नाकारले.

विरोधकांची ताकद केली क्षीण

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माळेगावच्या निमित्ताने बारामती तालुक्यातील विरोधकांची ताकद पुरती क्षीण करून टाकली. त्याचा परिणाम आगामी स्थानिक स्वराज्य संस्थात पाहायला मिळेल, अशी चिन्हे आहेत. पवार यांची ताकद, आवाका पाहता बारामती नगरपरिषद, माळेगाव नगरपंचायत आणि जिल्हा परिषद- पंचायत समिती निवडणुकात विरोधकांचा कितपत टिकाव लागेल, याची शंकाच आहे.

मत विभाजनाचा तावरे गुरू-शिष्यांना मोठा फटका

तावरे गुरू-शिष्य जोडीने उपमुख्यमंत्री पवार यांच्या पॅनेलशी निवडणूकपूर्व हातमिळवणी केली असती तर काही जागा त्यांच्या पदरात पडू शकल्या असत्या. शरद पवार गटाची साथ घेतली असती तरीही चित्र बदलू शकले असते. पण, ते देखील घडले नाही. शेतकरी- कष्टकरीला हलक्यात घेतले गेले. त्यातून मतांचे मोठ्या प्रमाणात विभाजन झाल्याने मोठा पराभव तावरे यांना सहन करावा लागला.

निवडणुकीत विजयी व पराभूत झालेले

उमेदवार व त्यांना पडलेली मते

अनुसूचित जाती जमाती

1) रतनकुमार भोसले.. 8670 ( निळकंठेश्वर पॅनेल)2) बापूराव गायकवाड... 7183 (पराभूत सहकार बचाव शेतकरी पॅनल)

भटक्या विमुक्त जाती जमाती

1) विलास देवकाते.. 8792 ( नीलकंठेश्वर पॅनेल)2) सूर्याजी देवकाते... 6572 (पराभूत सहकार बचाव शेतकरी पॅनेल)

इतर मागास प्रवर्ग (ओबीसी)1) नितीनकुमार शेंडे 8494 (निळकंठेश्वर पॅनेल) 2) रामचंद्र नाळे 7341 (पराभूत सहकार बचाव शेतकरी पॅनेल)

महिला राखीव-

1) संगीता कोकरे 8440 (नीलकंठेश्वर पॅनेल)2) ज्योती मुलमुले..7576 ( निळकंठेश्वर पॅनेल) 3) राजश्री कोकरे 7485 (पराभूत सहकार बचाव शेतकरी पॅनेल)4) सुमन गावडे 6099 (पराभूत सहकार बचाव शेतकरी पॅनेल)

गट नंबर एक : माळेगाव

निळकंठेश्वर पॅनलचे विजयी उमेदवार

1) शिवराज जाधवराव 86122) राजेंद्र बुरुंगले 8116 3) बाळासाहेब तावरे 7946.

सहकार बचाव शेतकरी पॅनेलचे पराभूत उमेदवार : 1) रंजनकुमार तावरे 73532) संग्राम काटे 6701 3) रमेश गोफणे 6302. रंजनकुमार तावरे यांना पराभवाचा धक्का एकूण 593 मतांनी पराभूत

गट नंबर दोन : पणदरे

निळकंठेश्वर पॅनेलचे विजयी उमेदवार

1) योगेश जगताप 8635 2) तानाजीकाका कोकरे 84953) स्वप्निल जगताप 7933

सहकार बचाव शेतकरी पॅनेलचे पराभूत उमेदवार 1) सत्यजित जगताप 6232 2) रणजीत जगताप 61343) रोहन कोकरे 7083

गट नंबर तीन : सांगवी

निळकंठेश्वर पॅनेलचे विजयी उमेदवार : 1) गणपत खलाटे 85432) विजय तावरे 7882.

सहकार बचाव शेतकरी पॅनेलचे विजयी उमेदवार : 1) चंद्रराव तावरे 8163,

सहकार बचाव शेतकरी पॅनेलचे पराभूत उमेदवार1) रणजीत खलाटे 7224 2) संजय खलाटे 6154. निळकंठेश्वर पॅनेलचे पराभूत उमेदवार 1) वीरेंद्र तावरे 7289

गट नंबर चार खांडज-शिरवली

श्री निळकंठेश्वर पॅनलचे विजयी उमेदवार : 1) सतीश फाळके 8404 2) प्रताप आटोळे 8328. सहकार बचाव शेतकरी पॅनेलचे पराभूत उमेदवार : 1) विलास सस्ते 64362) मेघशाम पोंदकुले 6422.

गट नंबर पाच- निरावागज

श्री निळकंठेश्वर पॅनेलचे विजयी उमेदवार : 1) अविनाश देवकाते 86402) जयपाल देवकाते 8051.

सहकार बचाव शेतकरी पॅनेलचे पराभूत उमेदवार : 1) राजेश देवकाते 6499 2) केशव देवकाते 6436.

गट नंबर सहा- बारामती

श्री निळकंठेश्वर पॅनेलचे विजयी उमेदवार : 1) देविदास गावडे 8028 2) नितीन सातव. 7858सहकार बचाव पॅनेलचे पराभूत उमेदवार : 1) गुलाबराव गावडे 70802) नेताजी गवारे 7021

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT