पुणे: महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाचे सभापती बाळासाहेब ऊर्फ प्रवीणकुमार नाहाटा यांच्यावर फसवणूकप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने संघाच्या इतिहासात प्रथमच अशी घटना घडली आहे.
त्यामुळे त्यांच्यावर कारवाईसाठी संचालकांमधून जोर वाढल्याचे सांगण्यात येते. तसेच संघावर वर्चस्व असलेले राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे नाहाटा यांच्यावर कारवाई करीत सभापती पदाचा राजीनामा घेणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी बाजार समित्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी राज्यस्तरीय शिखर संस्था असावी, या उद्देशाने महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाची स्थापना 1969 मध्ये केली. (Latest Pune News)
त्यानंतर अनेक बाजार समित्यांचे सभापती, संचालकांनी या संघाचे अध्यक्षपद भूषविले. अगदी आमदारही संचालक म्हणून कार्यरत राहिलेले असून आजपर्यंत कधीही संघाच्या सभापतींवर फसवणूकप्रकरणी गुन्हा दाखल झाला नव्हता, अशी माहिती काही संचालकांनी नांव न देण्याच्या अटीवर दिली. अजित पवार हे आता नाहाटा यांच्यावर कारवाई करण्यासाठी कोणती पावले उचलणार? याकडे बाजार समित्यांचे लक्ष लागले आहे.
मुख्यमंत्र्यांना भेटूनही माहिती देण्यासाठी संचालक आग्रही
दरम्यान, अध्यक्षांच्या अनुपस्थितीत उपाध्यक्ष व अन्य संचालक हे संचालक मंडळाच्या बैठकीची मागणी संघाच्या कार्यकारी संचालकांकडे करू शकतात. त्यादृष्टिने आमची चर्चा सुरू असून यापूर्वीच संघातील मनमानी कारभाराबद्दलची माहिती आम्ही पवार यांना दिल्याचे काही संचालकांनी सांगितले.
शिवाय एका संचालकाने तर लेखी पत्रही दिले होते. मात्र, त्यावर अजित पवार यांनी कोणतीच कारवाई केली नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता पवार यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. शिवाय सर्वपक्षीय संचालकांचा भरणा असलेले संचालक मंडळातील काही संचालक याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेण्याच्या तयारीत असल्याचे सांगण्यात आले.