

पुणे: राज्यात मुंबई, पुण्यासह सर्वच मोठ्या शहरांमध्ये हवेची गुणवत्ता खालावत आहे. वाहतूक कोंडी, वाहनांमधून बाहेर पडणारे धूलिकण, औद्योगिक प्रदूषण, ऋतूनुसार हवेच्या गुणवत्तेत होणारे बदल, यामुळे प्रदूषण उच्चांकी पातळी गाठत आहे. वाढत्या प्रदूषणामुळे श्वसनविषयक आजारांमध्ये भर पडत वाढत आहे. त्यामुळे दम्याच्या रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ झाल्याचे निरीक्षण नोंदविण्यात येत आहे.
गेल्या काही वर्षांत बांधकाम आणि रस्ते बांधणीचे काम सर्वच मोठ्या शहरांमध्ये झपाट्याने वाढत अहे. त्यामुळे हवेतील गुणवत्तेवर विपरीत परिणाम झाला आहे. वातावरणातील या धुळीमुळे अॅलर्जी होऊन अनेक जण दम्याचे बळी ठरत आहेत. मागील काही वर्षांत दम्याच्या रुग्णांमध्ये तब्बल 40 टक्क्यांची वाढ झाल्याचे दिसून येत आहे. (Latest Pune News)
पुणे शहरातील ‘रेस्पायर लिव्हिंग सायन्सेस’ या संस्थेने देशभरातील अकरा शहरांमधील हवाप्रदूषणाच्या पातळीचा नुकताच अभ्यास केला. त्यानुसार सूक्ष्म धूलिकणांची पातळी जास्त असून, प्रदूषणाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. प्रदूषणामुळे श्वास घेण्यास त्रास होणे, फुप्फुसांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होणे, सततचा खोकला, घशात खवखव अशी दम्याची लक्षणे दिसून येत आहेत.
छातीत जडपणा येणे, हे दम्याचे लक्षण आहे. बर्याचदा एकही लक्षण आढळून येत नाही. केवळ खोकलाच होतो. अशा वेळी खोकल्याकडे दुर्लक्ष केले जाते, म्हणून दीर्घकालीन खोकला, घशातून खरखर आवाज येणे, छाती भरून येणे, ही दम्याची लक्षणे असू शकतात. या आजाराच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
दम्याचे निदान कसे होते?
डॉक्टर वैद्यकीय परीक्षण करून दम्याचे निदान करतात. ‘पीक-फ्लो’ मीटरसारख्या यंत्राद्वारे रुग्णाची हवा फुंकण्याची क्षमता तपासून फुप्फुसाची क्षमता तपासण्यात येते. त्यामुळे दमा आहे की नाही, याचे प्राथमिक निदान शक्य होते. दम्याचे निदान करण्यासाठी लंग्ज फंक्शन टेस्ट (फुप्फुसाच्या कार्याची चाचणी) करावी लागते. त्यास ‘स्पायरोमीटरी’ असे म्हणतात. याशिवाय रक्ताची तपासणी, एक्स-रे काढणे, शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण तपासणे, अन्य आजारांमुळे तर दम लागत नाही, याची चाचणी करण्यासाठी अन्य तपासण्या कराव्या लागतात.
प्रदूषणाची पातळी ( मायक्रोग्रॅम प्रति चौ. मी.)
60 - शुद्ध हवा
80-100 - मध्यम
100-180- घातक
180-300 - धोकादायक
300-400 - गंभीर स्थिती
वाढत्या प्रदूषणामुळे काही जणांना वारंवार सर्दी व खोकल्याचा त्रास होत असल्याने उपचारासाठी रुग्णालयात येत आहेत. दर महिन्याला रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात खोकल्याची तक्रार घेऊन येणार्या 10 पैकी 4-5 जणांना दम्याचा विकार जडल्याचे दिसून येते. परंतु, पुरेशी माहिती नसल्याने याकडे दुर्लक्ष केले जाते. घरात एखाद्याला आधी अस्थमा असल्यास कुटुंबातील इतर व्यक्तींना हा आजार होण्याची शक्यता अधिक असते. परंतु, वेळीच निदान व उपचार घेतल्यास दमा नियंत्रणात राहू शकतो.
- डॉ. सम्राट शहा, इंटर्नल मेडिसीन एक्सपर्ट