पंढरपूर: येथील विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपूरला आषाढी आणि कार्तिकी एकादशीला लाखो आणि दररोज मोठ्या प्रमाणात भाविक येतात. भाविकांना व स्थानिक नागरिकांना पायाभूत सुविधा मिळाव्यात, यासाठी विकास आराखडा तयार करण्यात येणार आहे.
विकास आराखडा तयार करताना लोकप्रतिनिधी, स्थानिक नागरिक, व्यापारी, वारकर्यांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी जिल्हा प्रशासनाकडून चर्चा करण्यात आल्याने कॉरिडॉरला होणारा विरोध मावळू लागला आहे. पंढरपूरचा विकास आणि मिळणारा जादा मोबदला यामुळे 80 टक्के नागरिकांनी कॉरिडॉरच्या बाजूने आपली भूमिका दर्शवली आहे. (Latest Pune News)
कॉरिडॉरबाबत स्थानिक नागरिक, व्यापारी, विक्रेते यांच्याशी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पंढरपूरात येऊन मंदिर परिसरातील 800 लोकांशी प्राथमिक चर्चा केली. अडीअडचणी जाणून घेतल्या. कॉरिडॉर का गरजेचा आहे, बाधित मालमत्ताधारकांना काय सुविधा देता येतील, जास्तीचा मोबदला देण्याचे मान्य करत पंढरपूरचा विकास करण्यावर भर देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
कॉरिडॉरसाठी जबरदस्तीने भूसंपादन केले जाणार नाही. मंदिर परिसर भागातील सवेक्षण करण्यात येणार आहे. यात मालमत्ता धारक, व्यापारी, विक्रेते यांचे असणारे एकूण क्षेत्र, व्यवसाय त्यातून मिळणारे उत्पन्न याची माहिती घेतली जाणार आहे.
या माहितीच्या आधारे डाटा तयार करण्यात येऊन त्याबाबत पॅकेज तयार करण्यात येणार असल्याचा विश्वास जिल्हाधिकार्यांनी दिला. दरम्यान, काशी येथे राबवण्यात आलेला कॉरिडॉर यशस्वी ठरला आहे.
येथील पथकाने पंढरपुरात येऊन पाहणी केली आहे. जुने ऐतिहासिक मठ, मंदिर व समाधी यांची पाहणी केली आहे. या पथकाचा अहवाल आल्यानंतर तो नागरिकांसमोर ठेवण्यात येणार आहे. यावर नागरिकांची मते जाणून घेवून पुढील दिशा जिल्हा प्रशासन ठरवणार आहे. हे पथक पुढील आठवड्यात पुन्हा सर्व्हे करणार आहे.
मुंबई मेट्रोच्या भूसंपादनाच्या धर्तीवर नुकसान भरपाई
पंढरपूर कॉरिडॉरबाबत कोणत्याही मालमत्ता धारक, विक्रेते, व्यापारी यांचे नुकसान होऊ नये यासाठी नागरी वस्तीत करण्यात आलेल्या मुंबई मेट्रोच्या भूसंपादनाची पाहणी व माहिती घेण्यासाठी पथक पाठवण्यात आले होते. कॉरिडॉर झाला तर कमीत कमी जागा घेऊन जास्तीत जास्त लाभ कसा देता येईल, याबाबत प्रयत्न करण्यात येईल. काशी विश्वनाथ येथे कॉरिडॉर झाल्यानंतर तिथे मोठ्या प्रमाणात भाविकांची संख्या वाढली आहे. येथे कॉरिडॉर झाला तर निश्चितच भाविक वाढणार आहेत.