मुंढवा: ‘राष्ट्रवादी परिवार मिलन’ या उपक्रमांतर्गत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी केशवनगर, मुंढवा व घोरपडी येथील नागरिकांशी संवाद साधला. या वेळी केशवनगर परिसरातील काही सोसायट्यांमधील नागरिकांनी बिल्डरांच्या चुकीमुळे पिण्याचे पाणी मिळत नसल्याचे सांगितले. त्यावर नागरिकांना समस्या येत असतील, तर बिल्डरांचे काम थांबवा. त्यांना मस्ती आली असले, तर ॲक्शन घेणे प्रशासनाच्या हाती असल्याचे उपमुख्यमंत्री पवार यांनी या वेळी अधिकाऱ्यांना सुनावले.
केशवनगर-खराडीदरम्यान नदीपात्रातील अपूर्णावस्थेत असलेल्या पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना या वेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. रस्त्यांची दुरवस्था, वाहतूक कोंडी, पाणीपुरवठा आदी समस्यांची निवेदने नागरिकांनी त्यांनी दिली. (Latest Pune News)
मुंढव्यातील महात्मा फुले चौकातील वाहतूक कोंडीच्या समस्येची उपमुख्यमंत्री पवार यांनी पाहणी केली. आमदार चेतन तुपे, महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम, हडपसर क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त बाळासाहेब ढवळे पाटील, माजी उपमहापौर बंडू गायकवाड, माजी नगरसेविका सुरेखा कवडे, माजी नगरसेवक आनंद आलकुंटे, अशोक कांबळे, साहेबराव कवडे, देवेंद्र भाट, गणेश ढाकणे, संतोष पाखरे, संदीप कवडे, दिलीप माथवड, हेमराज कवडे, कैलास दळवी, नीलेश कवडे, काका पवार, रामभाऊ कसबे आदी उपस्थित होते.
केशवनगर येथील काही मोठ्या सोसायट्यांमध्ये नागरिकांनी पिण्याचे पाणी येत नसल्याच्या तक्रारी उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडे केल्या. याविषयी संबंधित बांधकाम व्यावसायिकांचे काम थांबविण्याच्या सूचना त्यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
मुंढवा येथील महात्मा फुले चौकात पाहणी करून येथे होणाऱ्या वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. रामटेकडी येथील वंदे मातरम चौकात उपमुख्यमंत्र्यांनी नागरिकांशी संवाद साधला. घोरपडी येथे कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद साधला.
पर्रीकरांसारखी करा न सांगता पाहणी...
उपमुख्यमंत्री अजित पवार केशवनगर-खराडी नदीपात्रातील पुलाची माहिती घेत असताना एका महिलेने ‘वाहतूक कोंडीला आम्ही कंटाळलोय, इथे राहायचे की नाही?’ असा प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित केला.
पर्रीकर यांच्यासारखी न सांगता पाहणी करा; म्हणजे वस्तुस्थिती तुमच्या लक्षात येईल,’ असा सल्ला या महिलेने त्यांना दिला. त्यावर पर्रीकर कोण? असा प्रतिप्रश्न पवार यांनीउपस्थित केला. त्यावर संबंधित महिलेने मनोहर पर्रीकर ते गोव्याचे मंत्री होते, असे सांगितले. त्यानंतर मी एकटा फिरेन; पण मला मीडियाने फिरू दिले पाहिजे, असेही उपमुख्यमंत्री पवार यांनी या वेळी नमूद केले.
उपमुख्यमंत्री सकाळी सहाला केशवनगरमध्ये
अजित पवार यांच्या गाड्यांचा ताफा सकाळी सहा वाजता केशवनगर येथे दाखल झाला. त्यानंतर पूर्वांकरा सोसायटीपासून पुढे नदीपात्रापर्यंत अधिकारी आणि कार्यकर्त्यांसमवेत जाऊन त्यांनी अपूर्णावस्थेतील पुलाची पाहणी केली. हे काम येत्या 15 जानेवारीपर्यंत पूर्ण होईल, असे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी या वेळी सांगितले. मात्र, शक्य तेवढ्या लवकर या पुलाचे काम पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.