नारायणगाव : विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या 40 व्या गळीत हंगामाच्या शुभारंभासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार येणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे. दि. 3 नोव्हेंबर रोजी गळीत हंगामाचा शुभारंभ होणार आहे. मागील हंगामाचा शुभारंभ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आला होता.(Latest Pune News)
विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांनी विधानसभेची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाकडून लढवली होती. विधानसभा निवडणुकीमध्ये शेरकर यांचा पराभव झाला होता. निवडणुकीनंतर शेरकर स्वतः अजित पवार यांना मुंबई येथे भेटायला गेले होते.
उपमुख्यमंत्री झाले म्हणून त्यांचे शेरकर यांनी अभिनंदन केले होते. सध्या राज्यातील सहकारी साखर कारखानदारी आर्थिक अडचणीत असल्यामुळे राज्य सरकारचा पाठिंबा असावा, यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या हंगामाचा शुभारंभ करण्यात येणार असल्याचे समजते. ‘विघ्नहर’चे अध्यक्ष शेरकर यांनी विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या एकाही जाहीर कार्यक्रमाला हजेरी लावलेली नाही. त्यामुळे सध्या सत्यशील शेरकर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसवर नाराज तर नाहीत ना? अशीही चर्चा जुन्नर तालुक्यात रंगू लागली आहे.
यंदाचा गळीत हंगाम पालकमंत्री अजित पवार यांच्याहस्ते करण्याचा मानस संचालक मंडळाचा आहे. दि. 3 नोव्हेंबर रोजी अजित पवार यांची वेळ मिळेल, असे आमचे प्रयत्न आहेत.सत्यशील शेरकर, अध्यक्ष, विघ्नहर साखर कारखाना
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी अजित पवार हे विघ्नहर कारखान्याच्या गळीत हंगामाच्या शुभारंभासाठी येणार असल्याने वेगवेगळी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. अजित पवार जुन्नर तालुक्याच्या दौऱ्यावर येत असल्याने या वेळी जुन्नर तालुक्यातील काही कार्यकर्त्यांचा त्यांच्या पक्षात प्रवेश होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. यामध्ये जिल्हा परिषदेचे माजी सदस्य गुलाब पारखे, वल्लभ शेळके व त्यांच्या पत्नी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या स्नेहल शेळके, मंगेश काकडे, सुनीता बोऱ्हाडे यांचा समावेश असल्याचे समजते.