पुणे: ‘अजित पवार जातीयवादी आहेत, असे काही जण कोणाच्या तरी जवळ जाण्यासाठी म्हणतात. मात्र, जिवात जीव असेपर्यंत मला जातीयवाद शिवणार नाही, याची मी खात्री देतो,’ अशी स्पष्टोक्ती उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांनी दिली.
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केलेल्या टीकेला पवार यांनी त्यांचे नाव न घेता उत्तर दिले. पवार म्हणाले की, मला कुणावर टीकाटिप्पणी करायची नाही. मला जसे कळायला लागले आहे, तेव्हापासून कधीही जातीयवाद केला नाही. सर्वांना एकत्र करूनच मी वाढलो आहे. माझ्याकडे येणार्यांची मी कधीच जात पाहत नाही, असे देखील पवार म्हणाले. (Latest Pimpri News)
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सवानिमित्त विविध क्षेत्रांत चांगली कामगिरी करणार्यांचा सत्कार समारोह राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते व धनगर ऐक्य परिषदेचे अध्यक्ष शशिकांत तरंगे यांनी आयोजित केला होता. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. या वेळी क्रीडा व युवक कल्याणमंत्री दत्तात्रय भरणे, धनगर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वासराव देवकाते, माजी आमदार पोपटराव गावडे, आयकर आयुक्त नितीन वाघमोडे, अभिमन्यू होळकर आदी उपस्थित होते.
प्रशासकीय क्षेत्रात चांगली कामगिरी केल्याबद्दल आयकर आयुक्त डॉ. नितीन वाघमोडे, शैक्षणिक क्षेत्रातून अॅड. चिमनराव डांगे, कृषी क्षेत्रातून धुळा कोकरे, उद्योग क्षेत्रातून राहुल हजारे, आरोग्य क्षेत्रातून अविनाश गोफणे, क्रीडा क्षेत्रातून रेश्मा पुणेकर, पुरुष कृषी क्षेत्रातून वेताळ शेळके, महिला कुस्ती क्षेत्रातून वैष्णवी थोरवे, क्रीडा क्षेत्रातून अरुण पाडुळे यांचा समाज गौरव पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.
अजित पवार म्हणाले की, अहिल्यादेवी होळकर यांचे विचार आजही दिशादर्शक असून, त्यांच्या आदर्शाने राज्याचा कारभार पुढे नेट आहोत. त्यांनी त्या काळात केलेल्या कामांची मोठी सध्या दुरावस्था झाली असून, त्यांच्या दुरुस्तीची कामे आम्ही हाती घेतली आहेत. धनगर समाजाचे आराध्य दैवत असणारे सांगली जिल्ह्यातील आरेवाडी येथील बिरोबा मंदिरात आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करून दिला जाईल. यासाठी हिवाळी अधिवेशनातील पुरवणी मागण्यांमध्ये तरतूद केली जाईल, अशी ग्वाही देखील अजित पवार यांनी या वेळी दिली.
मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, अजित दादांवर टीका केल्याशिवाय काहींना प्रसिद्धी मिळत नाही. त्यामुळे त्यांच्यावर कायम टीका केली जाते. धनगर समाजाचे आराध्य दैवत आरेवाडीचे बिरोबा मंदीर असून, त्याच्या विकासासाठी निधी मिळावा, अशी मागणी करण्यात आली आहे. अहिल्यादेवींनी 300 वर्षांपूर्वी, जलसंधारण, मंदिरांचा जीर्णोद्वार यांसह अनेक सामाजिक कामे केली. त्यांच्या या कामाचा आम्ही आदर्श घेऊन कामे करत आहोत. तरंगे म्हणाले की, अहिल्यादेवींचे कार्य हे देशभर नव्हे तर जगभर पोहोचण्यासाठी प्रयत्न केला जात आहे.