

Animal deaths in Pune zoo
पुणे: कात्रज येथील राजीव गांधी प्राणिसंग्रहालयात 16 चितळ मृत्युमुखी पडल्याची घटना नुकतीच घडली होती. ओडिशा येथील प्रयोगशाळेच्या अहवालानुसार या चितळांचा मृत्यू लाळ खुरकत या विषाणुजन्य आजारामुळे झाला असल्याचे समोर आले आहे.
यानंतर आता महापालिका आयुक्तांनी प्राणिसंग्रहालय अधिकार्यांकडून खुलासा मागविला आहे. विशेष म्हणजे, यामध्ये दोषी आढळल्यास संबंधित अधिकारी, कर्मचारी यांच्यावर कारवाई करणार असल्याची माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी दिली. (Latest Pune News)
राजीव गांधी प्राणिसंग्रहालयात 7 ते 12 जुलैदरम्यान 16 चितळांचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे खळबळ उडाली होती. मृत चितळांच्या मृत्यूचे कारण शोधण्यासाठी विविध शासकीय संस्थांना समाविष्ट करण्यात आले होते. क्रांतीसिंह नानासाहेब पशुवैद्यकीय महाविद्यालय शिरवळ आणि विभागीय रोग अन्वेषण प्रयोगशाळा, पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन येथील तज्ज्ञांच्या चमूने मृत प्राण्यांचे शवविच्छेदन करून जैविक नमुने गोळा केले होते.
हे नमुने राष्ट्रीय लाळ खुरकत संशोधन केंद्र, भुवनेश्वर (ओडिशा), भारतीय पशुवैद्यकीय संशोधन संस्था, बरेली, विभागीय वन्यजीव संशोधन व प्रशिक्षण केंद्र, नागपूर आणि राष्ट्रीय उच्च सुरक्षा प्राणी रोग शाळा, भोपाळ येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. यापैकी भुवनेश्वर येथील प्रयोगशाळेतून प्राप्त अहवालानुसार प्राण्यांची लक्षणे आणि प्रयोगशाळा तपासणी अहवाल जुळल्याने लाळ खुरकत या विषाणुजन्य आजाराचे संक्रमण झाल्याचे निदान झाले आहे.
या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी संग्रहालयातील प्राण्यांची काळजी व्यवस्थित घेतली जाते का? कामात काही कुचराई केली जाते का? असे विविध प्रश्न उपस्थित करून यासंदर्भात संग्रहालयातील अधिकार्यांकडून खुलासा मागविला आहे. येत्या सात दिवसांत प्राणिसंग्रहालयाच्या अधिकार्यांना याबाबत खुलासा करावा लागणार आहे. या अहवालात जर प्राणिसंग्रहालय अधिकारी व कर्मचारी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.
राजीव गांधी प्राणिसंग्रहालयात चितळाच्या मृत्यूनंतर महापालिका आयुक्तांनी प्राणिसंग्रहालयातील अधिकार्यांना याबाबत खुलासा सादर करण्याचे आदेश दिले आहेत. हा खुलासा आल्यावर योग्य ती कारवाई केली जाईल.
- ओमप्रकाश दिवटे, अतिरिक्त आयुक्त, पुणे मनपा