सुहास जगताप
पुणे: अजितदादा पवार म्हणजे पुणे शहर, जिल्हा, पिंपरी-चिंचवडच्या विकासाचे एक बलदंड इंजिन होते. या भागांमध्ये अनेक विकासाच्या योजना, उद्योग आणण्यामध्ये अजित पवारांचा सिंहाचा आणि मोलाचा वाटा होता. राज्य सरकारकडून भरभरून निधी त्यांनी या भागासाठी आणला. पुणे जिल्ह्याच्या विकासाला खऱ्या अर्थाने सुरुवात शरद पवारांनी ज्यावेळी या जिल्ह्याचे नेतृत्व हाती घेतलं, तेव्हापासून झाली.
शरद पवारांनी अनेक औद्योगिक वसाहती या जिल्ह्यामध्ये आणल्या तसेच पाण्याचे प्रश्न सोडवण्यासाठी धरणे बांधली, कालव्यांच्या योजना केल्या, शेतीचे प्रश्न सोडवले आणि तो तसाच विकासाचा बॅटन त्यांनी पुढे अजित पवारांच्या हातात दिला आणि अजित पवारांनी गेल्या 30-35 वर्षांत त्या कसोटीवर आपण खरे उतरल्याचे दाखवून दिले आहे. अजितदादांच्या या अकाली एक्झिटनंतर हा विकासाचा बॅटन हाती सोपवावा, असा नेता पुणे जिल्ह्यात तरी दूरपर्यंत दिसत नाही.
बारामती तर अजित पवार यांनी जवळपास आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहरच करून टाकलेले आहे. कुणालाही असं म्हणणं जरा अतिशयोक्ती वाटेल. परंतु, बारामती यापूर्वी पाहिलेले आहे आणि जो आता ती नीट पुन्हा उघड्या डोळ्याने पाहत आहे, त्याला ते कळेल. मायक्रोसॉफ्ट आणि गुगलची ‘सीईओ’ अनेक कंपन्यांचे मुख्याधिकारी, मोठे अधिकारी बारामतीमध्ये येऊन गेलेले आहेत. ‘एआय’ तंत्रज्ञानाचे देशातील पहिले इन्स्टिट्यूट बारामती येथे सुरू होत आहे. बारामती शहराच्या कालव्यावरून आपण फिरलो तर युरोपमध्ये आपण फिरत आहोत, असे वाटावे इतका विकास अजितदादांनी बारामतीचा केलेला आहे. आखीव-रेखीव अशी आजची बारामती ही अजितदादांची देणगी आहे.
अजितदादांनी पुणे जिल्ह्यामध्ये रस्ते, पाणी, वीज, शेतीचे पाणी,
शेतीचे प्रश्न, बेरोजगारीचे प्रश्न या प्रत्येकामध्ये लक्ष घातलेलं आहे. झपाटून काम करणारा आणि एखाद्या प्रकल्पासाठी राज्य शासनाकडून वाटेल तेवढा पैसा आणू शकेल अशी ताकद असलेला नेता, अशी अजित पवारांची प्रतिमा होती. पुण्याच्या भोवतीचा रिंग रोड हा अजित पवारांच्याचमुळे साकारत आहे.
पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील अनेक उड्डाणपूल, रस्त्यांची कामे ही अजित पवारांनी सुचवली आणि करून घेतली आहेत. पुण्याच्या मेट्रोला ही त्यांनी गती दिलेली आहे. पुणे जिल्ह्याच्या विकासाचे इंजिन म्हणजे अजितदादा पवार होते. शरद पवारांकडून त्यांना हा वारसा मिळाला होता. अजितदादा यांच्या अचानक एक एक्झिटने आता हा विकासाचा बॅटन कुणाच्या हातात द्यायचा, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे.
अजितदादांच्या तोडीचा किंवा त्यांच्या जवळपासही पोहोचेल, असा एकही नेता सध्या पुणे जिल्ह्यामध्ये कोणत्याच पक्षात अस्तित्वात नाही. केंद्र आणि राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणात निधी आणण्याची अजित पवार यांची प्रचंड मोठी क्षमता होती. विकासकामे झपाटल्यासारखी करून सर्वसामान्य माणसाचे जीवनमान उंचावण्याची धडपड अजित पवार यांची होती.
सर्व समस्या, प्रश्न उलगडणारा नेता
प्रशासनावर प्रचंड हुकमत आणि पुणे जिल्ह्यातील गावोगावचे आणि शहरातील गल्ली गल्लीतील प्रश्न माहीत असलेला नेता म्हणजे अजितदादा पवार होय. प्रत्येक व्यक्ती, नेता मग तो विरोधी पक्षातला का असेना, अजितदादांना माहिती होता, त्या त्या भागातले प्रश्न त्यांना माहीत होते, त्यामुळे त्यांना फार काही सांगण्याची गरज लागत नसे. माणसाचा चेहरा आणि त्याने थोडी फार माहिती दिली तरी त्यांच्यासमोर सगळी समस्या, प्रश्न उलगडत जात असत.