पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शहरातील सुमारे 3 हजार 63 कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण गणेश कला क्रीडा रंगमंच येथे पार पडले. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. यावेळी त्यांनी पुण्यातील पूल, मेट्रो प्रकल्प, वाहतूक समस्या आणि आगामी विकासकामांबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पुणे आता मेट्रोच्या वन कार्ड प्रणालीवर आले असून सार्वजनिक वाहतूक अधिक सुलभ करण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल आहे. पुण्यात आजपर्यंत कसे पूल बांधले गेले, हे अनेकदा समजत नाही, म्हणूनच कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन राबवून मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढवण्यासाठी सीमलेस प्लॅनिंग केले जात आहे. या नियोजनामुळे पुणे शहरातून संपूर्ण पीएमआर क्षेत्रात सहज प्रवास शक्य होईल. शहरातील वाढती वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी मुंबईप्रमाणे टनेलचे जाळे उभारण्याचे नियोजन सुरू असून, रिंगरोड पूर्ण झाल्यानंतर पुण्यातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर कमी होईल.
पर्यावरणाच्या दृष्टीने जायका प्रकल्पासारखे उपक्रम पुण्यात राबवले जाणार असून, मोठ्या प्रमाणावर एसटीपीचे जाळे उभारून शुद्ध केलेले पाणी नदी-नाल्यांमध्ये सोडण्याचे नियोजन आहे. पुण्याकडे भविष्यातील ग्रोथ हब म्हणून पाहिले जात असून, एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था निर्माण करण्याची क्षमता पुण्यात आहे. आज ऑईलपेक्षा डेटाची किंमत अधिक झाली असून, मुंबई–पुणे दरम्यान एआय आधारित मोठा कॉरिडॉर उभारण्याचे नियोजन आहे. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी एआयचा अधिकाधिक वापर केला जात असून, पुण्याच्या सर्वांगीण विकासासाठी आपण आणि सरकारमधील सर्व मंत्री कटिबद्ध आहोत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, मगरपट्टा पूल तसेच भैरोबा नाल्यापर्यंतचा पूल पाडून नव्याने बांधावा लागणार असून, त्या पुलावरून मेट्रो धावेल. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सविस्तर चर्चा झाली आहे. पुण्याच्या भविष्यातील वाहतूक व्यवस्थेचा विचार करून हे निर्णय घ्यावे लागत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
चांदणी चौकातील उड्डाणपुलाबाबत बोलताना अजित पवार म्हणाले की, सुरुवातीच्या काळात या पुलामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत होती. मात्र, आता वाहतूक सुरळीत होत असून नागरिकांना या रचनेची सवय झाली आहे. शहरात नियोजनबद्ध पायाभूत सुविधा उभारल्यास वाहतूक कोंडी कायमस्वरूपी कमी होऊ शकते, असेही त्यांनी नमूद केले.
नवले पुलासारख्या ठिकाणी वारंवार होणाऱ्या अपघातांवर त्यांनी तीव्र शब्दांत चिंता व्यक्त केली. “काही पुलांवर उतार चुकीच्या पद्धतीने देण्यात आले आहेत. चुकीच्या डिझाइनमुळे अपघात होत आहेत. हे डिझाइन करणारे अधिकारी आता निवृत्त झाले आहेत, पण अपघातांची किंमत आज नागरिकांना मोजावी लागत आहे. लोक आम्हाला विचारतात, हे पूल कोणी बांधले? सतत अपघात का होत आहेत?” असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला.
पायाभूत सुविधांच्या दृष्टीने नागपूरचे उदाहरण देताना ते म्हणाले की, नागपूरमध्ये खाली रस्ता, वर पूल आणि त्या पुलावरून मेट्रो धावते. ही संकल्पना इतकी यशस्वी ठरली आहे की, अमेरिकेतही अशा प्रकारचा पूल उभारण्याचा विचार सुरू आहे. पुण्यातही अशाच आधुनिक रचनेचे प्रकल्प राबवले जाणार असल्याचे त्यांनी संकेत दिले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संदर्भात बोलताना अजित पवार म्हणाले की, नगरसेवक किती हवेत, हे पुणेकर ठरवतील. लोकशाही व्यवस्थेत अंतिम निर्णय जनतेचाच असतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमात ‘पुणे ग्रँड टूर 2026’ या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेबाबतही चर्चा झाली. अजित पवार म्हणाले की, या ग्रँड टूरमुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेला मोठा हातभार लागणार आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे रस्ते, मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त आणि डीपीडीसीकडून सर्वाधिक निधी देण्यात आला आहे. मात्र, शहरातील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्तांनी कोयता गँगवर कठोर कारवाई करावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
पुणे मेट्रोबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, सध्या मेट्रोला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असून दररोज सुमारे दोन लाख प्रवासी मेट्रोने प्रवास करत आहेत. अद्याप मेट्रोचे जाळे पूर्णपणे विस्तारलेले नसले तरी, लवकरच मार्गिका वाढविल्यानंतर प्रवासी संख्या मोठ्या प्रमाणावर वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.