Ashish Shelar Pudhari
पुणे

Ajit Pawar Plane Crash Inquiry: अजित पवार विमान अपघाताची घाई न करता पारदर्शक चौकशी करा; आशिष शेलार यांची भूमिका

राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय यंत्रणांकडून तपास सुरू; एकपडदा चित्रपटगृहांचा प्रश्न लवकर मार्गी लावणार, साहित्य संमेलनाच्या खर्चाचा निर्णय साहित्य परिषदेकडे

पुढारी वृत्तसेवा

पुणे: दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताची सखोल आणि पारदर्शक चौकशी झाली पाहिजे, अशी भूमिका सर्वच राजकीय पक्षांनी विधानसभेत मांडली आहे. त्यामुळे त्यांच्या अपघाताच्या चौकशीबाबत कोणतीही घाई न करता योग्य पद्धतीने तपास होणे आवश्यक आहे, असे मत राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी व्यक्त केले. या प्रकरणाच्या चौकशीसाठी राज्य, राष्ट्रीय तसेच काही आंतरराष्ट्रीय यंत्रणा काम करत असल्याचेही त्यांनी सांगितले.

पुण्यात आयोजित पुस्तक प्रकाशनानंतर शेलार यांनी राजकीय, सांस्कृतिक आणि साहित्यिक विषयांवर पत्रकारांशी संवाद साधला. अजित पवार यांच्या अपघाताच्या चौकशीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसकडून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्याच्या भूमिकेबाबत शेलार म्हणाले, अजित पवार यांच्या निधनाचे दुःख सर्वांनाच आहे. त्यांच्या अपघाताची सखोल आणि पारदर्शक चौकशी व्हावी, हीच भूमिका सर्व राजकीय पक्षांनी घेतली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. या प्रकरणात वरकरणी चौकशी न करता योग्य पद्धतीने तपास करण्याची सरकारची भूमिका आहे. अजित पवार यांच्या पुतळ्याला सांस्कृतिक विभागाने मान्यता दिली असून, पुतळाही तयार आहे. मात्र, संबंधित शिल्पकाराला अद्याप पैसे मिळाले नसल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. त्यावर, ‘या प्रकरणाची माहिती घेऊन त्यावर भाष्य करेन,’ असे शेलार यांनी स्पष्ट केले.

एकपडदा चित्रपटगृहांचा प्रश्न लवकरच मार्गी लावणार

राज्यातील बंद पडलेली एकपडदा चित्रपटगृहे सरकारने ताब्यात घेऊन ती मराठी चित्रपटांसाठी खुली करण्याची घोषणा २०१४ मध्ये तत्कालीन सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी केली होती. मात्र, अद्याप या निर्णयाची अंमलबजावणी झालेली नाही. याबाबत शेलार म्हणाले, हा प्रश्न प्रलंबित असल्याचे मान्य आहे. यासंदर्भात विविध विभागांच्या अनेक बैठका झाल्या आहेत. महसूल, नगरविकास, गृहनिर्माण, गृह आणि सांस्कृतिक विभागांचा यामध्ये सहभाग आहे. काही चित्रपटगृहांच्या खासगी मालकांचे प्रश्न आहेत, तर काही प्रकरणे न्यायालयात आहेत. मराठी चित्रपट निर्मात्यांची मागणीही योग्य आहे. त्यामुळे याबाबतचा अंतिम निर्णय लवकरात लवकर घेण्यात येईल.

संमेलनाध्यक्षपदाबाबत परिषदेचा निर्णय योग्य

शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेने सुचविलेल्या स्वीकृत सदस्यांच्या नावांवर आक्षेप घेतला जात असल्याबाबत विचारले असता, शेलार म्हणाले, ‘लोकशाहीत कायदा टिकला पाहिजे. साहित्य परिषदेने घेतलेला निर्णय कायद्याच्या कसोटीवर शंभर टक्के योग्य आहे. आक्षेप घेणाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे.

साहित्य संमेलनाच्या खर्चाबाबत साहित्य परिषद निर्णय घेणार

दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर साहित्य संमेलनाच्या आयोजनासाठी होणाऱ्या खर्चावर मर्यादा घालणार का, या प्रश्नावर त्यांनी संमेलन आणि साहित्य परिषदेच्या पदाधिकाऱ्यांकडे निर्णय सोपविला. साहित्य परिषदेचे पदाधिकारी निर्णय घेताना दुष्काळी परिस्थितीचा विचार करतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT