पुणे: महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे महाराष्ट्राच्या विकासातील गेल्या चार दशकांतील योगदान पाहता त्यांना 'मरणोत्तर पद्मविभूषण' पुरस्काराने सन्मानित करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार विक्रम काकडे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात आमदार काकडे यांनी केंद्रीय गृहमंत्री शहा यांची दिल्लीत भेट घेऊन त्यांना निवेदन दिले आहे.
आमदार काकडे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्राच्या विकासात गेली चार दशके स्व. अजित पवार यांनी अतुलनीय योगदान दिले आहे. आमदार, खासदार, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून काम करण्या बरोबरच अजित पवार यांनी अर्थ व नियोजन, जलसंधारण, ऊर्जा, ग्रामीण विकास, कृषी आदी अनेक महत्त्वपूर्ण विभागांत अमूल्य योगदान दिले आहे.
स्व. पवार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागातही अनेक लोककल्याण कारी उपक्रम व प्रकल्प राबविले गेले आहेत. त्यांची दूरदृष्टी आणि त्वरित निर्णय घेण्याच्या क्षमतेमुळे कायमच ते चर्चेत राहिले. याच कारणास्तव त्यांना जनतेचे प्रचंड प्रेम मिळाले.
त्यांचे योगदान येणाऱ्या अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहणार आहे. स्व. अजित पवार यांचे कार्य लक्षात घेऊन केंद्र सरकारने त्यांना 'मरणोत्तर पद्मविभूषण' पुरस्कार देऊन सन्मानित करावे. केंद्र सरकारने या मागणीचा सहानुभूतिपूर्वक विचार करावा, अशी विनंती आमदार काकडे यांनी गृहमंत्री शहा यांच्याबरोबरील भेटीदरम्यान केली आहे.