नारायणगाव : जुन्नर, आंबेगाव, शिरूर व खेड तालुक्यात बिबट्यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात असून, शासनाने याबाबतची गांभीर्याने दखल घेतली आहे. यासाठी लागणारे सर्व साहित्य व यंत्रणा तातडीने उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
जुन्नर येथे एका कार्यक्रमाला आले असता ते बोलत होते. बिबट्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालल्याने जनतेमध्ये आक्रोश वाढतोय. याचे गांभीर्य ओळखून सरकारने याबाबतची दखल घेतली आहे. काही बिबटे गुजरातला पाठवण्याचा निर्णय झाला आहे. त्याचबरोबर बिबट्याला पकडण्यासाठी लागणारी सर्वसाधारण सामग्री वन खात्याला तातडीने उपलब्ध करून दिली जाणार आहेत. तसेच बिबट्याला पकडण्यासाठी पिंजऱ्यांची उपलब्धता करून दिली जाणार आहे
वन खात्याला साधन सामग््राी खरेदीसाठी सरकारने 11 कोटीहून अधिक निधीची तरतूद तत्काळ केली आहे. तसेच शिरूर तालुक्यामध्ये बिबट्याच्या हल्ल्यात तीन जणांचा मृत्यू झाल्याने राज्याचे वनमंत्री गणेश नाईक स्वतः येऊन गेले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये बिबट्याच्या कायमस्वरूपी बंदोबस्तासाठी केंद्र सरकारशी संवाद साधला आहे
....म्हणून राष्ट्रवादीला फटका राज्यामध्ये महायुतीचे सरकार आहे. राष्ट्रवादी काँग््रेासचे अधिकाधिक आमदार विजयी होतील अशी अपेक्षा होती. परंतु, भाजपाने लोकसभेत अब की बार 400 पार अशी घोषणा केली होती. त्यामुळे लोकांमध्ये विरोधकांनी संविधान बदलाचा चुकीचा मेसेज पसरवला. याचा विधानसभेत सर्वाधिक फटका राष्ट्रवादी काँग््रेासला बसल्याचे या वेळी अजित पवार यांनी स्पष्ट केले.
बारामतीतही दिसला बिबट्या बारामती ः बारामती शहरातील वीर गोगादेव मंदिर परिसरात शुक्रवारी (दि. 28) भल्या पहाटे काही नागरिकांना कऱ्हा नदीच्या तीरावर बिबट्या दिसला. दरम्यान वन विभागाने मात्र याचे खंडण केले आहे. सोशल मीडियावर फिरत असलेला फोटो हा एआय तंत्रज्ञान वापरून केलेला असल्याचा दावा वन विभागाने केला आहे. मात्र, प्रत्यक्ष पाहणारे नागरिक आपल्या म्हणण्यावर ठाम आहेत. बारामती शहरात शुक्रवारी सकाळी अचानक बिबट्या दिसल्याची घटना समोर आल्याने नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. कऱ्हा नदीकिनारच्या एका जीममधून काहींनी त्याची छायाचित्रे घेत ती पसरवल्याचे सांगितले जात आहे. शहरभर ही बातमी पसरली.
मंचर : मंचर शहर व परिसरात बिबट्यांचे दिवसा तसेच रात्री दर्शन होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या दहशतीचा परिणाम थेट मंचर नगरपंचायतीच्या निवडणूक प्रचारावर झाल्याचे स्पष्टपणे दिसते आहे. रात्री दहापर्यंत प्रचार करण्याची अधिकृत वेळ असताना प्रत्यक्षात थंडी, अंधार लवकर पडत असल्याने उमेदवार आणि कार्यकर्ते सुरक्षितता बाळगताना दिसते. निवडणुकीचा प्रचार रात्री उशिरापर्यंत चालत असतो. घरोघर भेटी, कोपरा सभा, जनसंपर्क मोहीम संध्याकाळनंतर अधिक जोरात होतात. पण सध्या शहराच्या प्रवेशद्वारांपासून ते उपनगरी वस्त्यांपर्यंत बिबट्याची हालचाल वाढल्याने उमेदवार आणि त्यांच्या टीमला अंधारात फिरणे धोकादायक वाटू लागले आहे. काही ठिकाणी रात्री आठनंतर वर्दळ नगण्य होत आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांचा प्रचाराचाही उत्साह कमी होत आहे. गावातील मुळेवाडी रोड, जुना चांडोली रस्ता, एस कॉर्नर, डोबीमळा, सुलतानपूर रोड, चिंचोटी तसेच अवसरी कॉलेज रस्ता जंगलपट्टीलगतच्या वस्त्यांमध्ये रात्री प्रचाराला जाण्यास कार्यकर्ते कचरतात.