पुणे /शिक्रापूर: महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग््रेास शरदचंद्र पवार पक्ष तसेच रिपाइं सचिन खरात गट यांच्याशी आमची आघाडी झाली आहे. आघाडी असल्यामुळे त्यांना काही जागा देण्यात आल्या आहेत. त्यामुळे त्या जागांवर कोणाला उमेदवारी द्यायची, हा त्या पक्षाचा निर्णय आहे, असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुन्हेगारांना उमेदवारी देण्याच्या मुद्द्यावरून रिपाइंकडे बोट दाखविले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी (दि. 1) पहाटेच पेरणे फाटा येथील विजयस्तंभास मानवंदना दिली. याप्रसंगी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, सहपोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, बार्टीचे महासंचालक सुनील वारे, रिपब्लिकन पार्टीचे सचिन खरात आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला.
महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग््रेासने गुंड गजानन मारणे याची पत्नी जयश्री मारणे, गुंड बंडू आंदेकरची स्नुषा सोनाली आणि भावजय लक्ष्मी उदयकांत आंदेकर या तिघींना उमेदवारी दिली आहे. त्यांपैकी सोनाली आणि लक्ष्मी या दोघी कारागृहातून निवडणूक लढविणार आहेत. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांच्या कुटुंबीयात उमेदवारी दिल्याने अजित पवार यांच्यावर टीका होत आहे. यासंदर्भात अजित पवार यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी ही जबाबदारी अप्रत्यक्षपणे ढकलण्याचा प्रयत्न केला. पवार म्हणाले, ’आत्तापर्यंतच्या निवडणुकांकडे पाहिले, तर राष्ट्रवादी काँग््रेासने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाबरोबर (सचिन खरात गट) आघाडी केल्याचे दिसून येते. महापालिका निवडणुकीतही ही आघाडी कायम आहे. आघाडी असल्यामुळे त्यांना काही जागा सोडण्यात आल्या आहेत. आघाडी असल्यामुळे आणि जागा सोडल्यामुळे त्या जागांवर कोणाला उमेदवारी द्यायची, हा त्यांचा निर्णय असतो. या विषयावर आपण स्वंतत्र पत्रकार परिषद घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत ’एबी’ अर्ज देण्याबाबत गोंधळाची परिस्थिती होती. कोणता उमेदवार कुठे जात आहे आणि कोणाला कोठून उमेदवारी दिली जात आहे, याबाबतही गेोंधळ होता. अशा परिस्थितीत या युतीमधील घटकपक्षांकडून अतिरिक्त एबी फॉर्मचे वाटप झाले आहे. तो घोळ आजच मिटवणार असल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच राष्ट्रवादी कॉंग््रेासचे अध्यक्ष अजित पवार यांनी सांगितले. यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सचिन खरात यांनी सांगितले की, कोरेगाव भीमा परिसराच्या विकासाबाबत अजित पवार यांच्याशी चर्चा झाली असून, इतर विषयांवर चर्चा झाल्यानंतर माध्यमांशी सविस्तर बोलणार आहे.
शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांच्याशी करणार चर्चा
महापालिका निवडणुका झाल्यानंतर जिल्हा परिषद निवडणुकांसाठी आचारसंहिता लागू होणार आहे. त्यामध्ये विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि कोकणात आरक्षणमर्यादा ओलांडली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. तो देखील प्रश्न लवकरच सुटेल आणि निवडणूक आयोग या निवडणुका जाहीर करतील. यासह पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये शिंदे गटाची शिवसेना व राष्ट्रवादी काँग््रेास एकत्रितपणे निवडणुका लढवण्याबाबत शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चा करणार असल्याचे उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले.