बारामती: राज्यात २८८ नगरपरिषदा-नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. महायुती म्हणून आम्ही एकत्रित जनतेपुढे जावे अशी आमची इच्छा आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. (Latest Pune News)
बारामतीत पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, निवडणूका एकत्रित लढण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीकडून सुनील तटकरे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, शिवसेनेचे उदय सामंत आदी लोक एकत्रित बसतील, चर्चा करतील. सगळ्यांनी एकत्रित लोकांपुढे गेले पाहिजे असे आमचे मत आहे. पण आघाडी सरकार असताना आम्ही स्वतंत्र लढत होतो. स्वतंत्र लढल्यावर मताची विभागणी होते. फायदा होणार असेल तर एकत्रितपणे लढले पाहिजे. आता निवडणुकीच्या निमित्ताने प्रत्येक पक्ष आपापली तयारी करत आहे. जेथे ज्या पक्षाची ताकद अधिक असेल त्यांनी इतर मित्रपक्षांना सन्मानपूर्वक जागा दिल्या तर फारसा प्रश्न उरत नाही, असे सांगून पवार म्हणाले, प्रत्येकाला आपली ताकद आजमावण्याचा अधिकार आहे.
सावंतांची विनाशकाले विपरित बुद्धी
माजी मंत्री तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादीवर केलेल्या टिकेवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पलटवार केला. या प्रश्नावर ते म्हणाले, विनाशकाले विपरित बुद्धी. आम्हाला यावर काही बोलायचे नाही. आम्ही सुसंस्कृत महाराष्ट्रात राजकारण करतो. दुसऱ्यांनी वेडेपणा केला, बेजबाबदार आरोप केला म्हणून उत्तरे देत बसत नाही.
विखे पाटलांशी चर्चा करेल
मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकरी कर्जमाफीबद्दल केलेल्या वक्तव्याबबत पवार यांना विचारले असता ते म्हणाले, मी त्यांच्याकडून माहिती घेईल. ते आणि मी दोघे शेतकरी आहोत. याबद्दल त्यांच्याशी मी चर्चा करेन.
ड्रोनद्वारे टेहळणीबाबत माहिती नाही
मुंबईत ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्री परिसरात ड्रोनद्वारे टेहळणी केली जात असल्याचा आरोपावर ते म्हणाले, याबाबत मला काही माहिती नाही. पोलिस खात्याचा हा विषय आहे. पण मी कोणावर नजर ठेवलेली नाही.