पुणे: अजित पवार यांच्याशी भोसलेनगरमधील त्यांच्या जिजाऊ या बंगल्यात दोन महिन्यांत तीन ते चारवेळा भेट झाली. मात्र, दि. 26 जानेवारीला झालेली भेट व गप्पांमधून ते रिलॅक्स व आनंदी असल्याचे जाणवले, असे ज्येष्ठ पत्रकार व आकाशवाणीचे निवृत्त वृत्तसंपादक चंद्रशेखर कारखानीस यांनी दै. ‘पुढारी’शी बोलताना सांगितले आहे.
कारखानीस पुढे म्हणाले की, गेल्या दोन महिन्यांत अजितदादांची जिजाऊ बंगल्यावर चारवेळा भेट झाली. महापालिकेच्या निवडणुकांमुळे ते फारच व्यस्त होते. कायमच कार्यकर्त्यांची गर्दी असायची. एका भेटीच्या वेळी तर तिकीट वाटपाच्या चर्चा सुरू होत्या. त्या संपवून आम्हाला भेटण्याकरिता येण्यास त्यांना उशीर झाला. तेव्हा हात जोडून त्यांनी आमची माफीही मागितली. राज्याचा उपमुख्यमंत्री हात जोडून आपली माफी मागतो आहे, हे पाहून आम्हालाच कसेतरी झाले. त्यावर मी त्यांना म्हणालो, अहो तुम्ही बिझी आहात, हे दिसते आहे. त्यामुळे तुम्ही माफी मागण्याची काहीही गरज नाही.
गडबडीमुळे त्या दिवशी आमची चर्चा झाली नाही. त्यामुळे 25 जानेवारीला सायंकाळी 6 वाजता भेटायचे असे ठरले. परंतु, बारामतीहून परतण्यास त्यांना उशीर होणार असल्याचे स्पष्ट झाल्यावर त्यांच्या सहायकाने फोन करून ही भेट रद्द केली. तसेच दुसऱ्या दिवशी म्हणजे 26 जानेवारीला सकाळी 9 वाजता या, असेही कळविले.
सोमवारी, 26 जानेवारीला ठरल्यानुसार ध्वजवंदनाचा कार्यक्रम आटोपून ते जिजाऊ बंगल्यावर परतले. या वेळी ते रिलॅक्स व आनंदी होते. महापालिकेच्या निवडणुका संपल्याने आता मोकळा झालोय, आपण आता शांतपणे बोलू, असे म्हणत त्यांनी चहा व पोहे मागविले. पोहे खाता-खाता आमची चर्चा सुरू झाली. त्यामध्ये तास-दीड तास कसा गेला, हे कोणालाच समजले नाही.
परत निघताना आपण एक फोटो घेऊया, असे सांगत त्यांनी आम्हाला हॉलमधील गायीच्या फोटोजवळ उभे राहण्याची सूचना केली व सहायकाकरवी आमचे फोटोही घेतले. आनंदी मूडमध्ये त्यांनी काढून घेतलेला कदाचित हा अखेरचाच फोटो असावा.