Pune District Cooperative Bank Pudhari
पुणे

Ajit Pawar Krushi Samruddhi Yojana: अजितदादांच्या स्वप्नांना नवी दिशा; पीडीसीसी बँकेची ‘कृषी समृद्धी’ कर्ज योजनेला सुरुवात

शेतकरी आणि सहकार विकासाचा वारसा पुढे नेणार; एआय तंत्रज्ञानावर आधारित योजनेसाठी १ हजार कोटींची तरतूद

पुढारी वृत्तसेवा

पुणे: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची दोन दिवसांपूर्वी झालेली जयंती आणि पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने (पीडीसीसी) अजितदादा पवार कृषी समृद्धी कर्ज योजना शुभारंभाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने पवार यांच्या आठवणीने संपूर्ण सभागृह भावनिक झाले. प्रत्येकाने आपापले विचार मांडताना त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. जिल्हा बँकेच्या माध्यमातून आणि सहकारातून ग्रामीण भागाचा व सामान्य शेतकऱ्यांच्या विकासाचे अजितदादा पवार यांनी पाहिलेले स्वप्न साकार करणे आणि तोच वारसा पुढे नेणे हीच खरी त्यांना आदरांजली ठरेल, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले.

जिल्हा बँकेने अजितदादा पवार यांच्या जयंतीच्या निमित्ताने अजितदादा पवार कृषी समृद्धी योजना शुभांरभ (एआय तंत्रज्ञानावर आधारित) आणि आदर्श शेतकरी सन्मान सोहळा व शेतकरी मेळावा श्री गणेश कला क्रीडा केंद्रात शुक्रवारी (दि.२४) दुपारी संपन्न झाला. व्यासपीठावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, माजी मंत्री व बँकेचे संचालक आमदार दिलीप वळसे पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे, उपाध्यक्ष सुनील चांदेरे व संचालक मंडळ, राज्याचे साखर आयुक्त डॉ. संजय कोलते, तसेच आमदार शंकर मांडेकर, म्हाडा पुणेचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील व मान्यवर उपस्थित होते.

अजितदादांनी शेतकऱ्यांसाठी आयुष्यभर काम केले : सुनेत्रा पवार

शेतकरी, शेती आणि सहकाराच्या विकासाचा ध्यास घेऊन अजितदादा पवार यांनी अखंडपणे काम केले. शेतकऱ्यांचा विकास आणि त्यांच्या चेहऱ्यावरचे हास्य फुलण्यासाठी त्यांनी आयुष्यभर काम केल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केले. पुणे जिल्हा बँकेंच्या सर्वतोपरी विकासासाठी ३६ वर्षांहून अधिक काळ काम केले. त्यातून देशात पुणे जिल्हा बँक सर्वोत्कृष्ट होण्यासाठीचे त्यांचे नेतृत्व, दुरदृष्टी आणि कठोर परिश्रमामुळे आज बँक भक्कम स्थितीत असल्याचे गौरवोद्‌गार त्यांनी काढले. जिल्हा बँकेंने दादांच्या नावाने सुरू केलेल्या कर्ज योजनेसाठी एक हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

सध्या हवामान बदल, शेतीचा वाढता उत्पादन खर्चामुळे शेतकरी अडचणीत असल्याचे ओळखून अजितदादा पवार यांनी राज्याच्या अर्थसंकल्पात कृत्रिम बुध्दिमत्ता (एआय) ५०० कोटी रुपयांची तरतूद केली होती. उसामध्ये एआय तंत्रज्ञानातून उत्पादनात ४० टक्‍के वाढ होते. शिवाय पाणी आणि खतांच्या बचतीलाही फायदा होतो. त्यामुळे हे एआय तंत्रज्ञान सर्वत्र पोहोचविण्याची जबाबदारी सर्वांची आहे. त्यांनी महिला सक्षमीकरणासही स्थान दिले. अजितदादा पवार यांनी ज्या विश्वासाने पीडीसीसी बँक वाढविली, त्याच पावलावर पाऊल ठेवून तो वारसा पुढे नेऊन समृद्धी वाढविणे हीच खरी त्यांना आदरांजली ठरेल, असेही पवार म्हणाल्या.

कृषिमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, की पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विकासात आणि माझ्या राजकीय जडणघडणीतही अजितदादा पवार यांचा मोठा वाटा आहे. प्रास्ताविकात बँकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे यांनी या कर्ज योजनेची माहिती दिली. या वेळी जिल्ह्यातील प्रगतिशील शेतकरी व महाराष्ट्र शासनाचे कृषी पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. या वेळी विविध सहकारी संस्थांचे पदाधिकारी, तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT