“टाकी बांधली, रंगरंगोटी झाली, मग पाणी का नाही?” — अजित पवारांचा अधिकाऱ्यांना सवाल Pudhari
पुणे

Ajit Pawar Katraj Water Project: “टाकी बांधली, रंगरंगोटी झाली, मग पाणी का नाही?” — अजित पवारांचा अधिकाऱ्यांना सवाल

कात्रज पंपिंग स्टेशन आणि उड्डाणपूल प्रकल्पाच्या पाहणीत विलंबावर नाराजी; सात दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश

पुढारी वृत्तसेवा

कात्रज : कात्रज चौकातील उड्डाणपूल व वंडरसिटी येथील पंपिंग स्टेशननच्या कामाची शनिवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाहणी केली. या कामांना गती देण्याच्या सूचना या वेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच प्रकल्पातील विलंब, अपूर्ण कामे आणि विद्युत पुरवठ्याशी संबंधित अडथळ्यांबाबत त्यांनी नाराजीही व्यक्त केली. ‌‘पाण्याची टाकी झाली, रंगरंगोटी झाली, पण मग पाणी का नाही,‌’ अशा शब्दांत त्यांनी अधिकाऱ्यांना सुनावले. (Latest Pune News)

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत बांधण्यात येणाऱ्या पंपिंग स्टेशन आणि पाण्याच्या टाकीच्या कामाची तपासणी करताना प्रकल्प वेळेत पूर्ण न झाल्याबद्दल या वेळी नाराजी व्यक्त केली. मोठ्या कंपन्या प्रकल्प रखडवत असतील, तर त्याचा आर्थिक फटका महापालिकेला आणि त्रास नागरिकांना सहन करावा लागत असल्याचे याप्रसंगी ते म्हणाले.

महावितरण कंपनीला आवश्यक जागा न मिळाल्यामुळे 22 केव्ही सबस्टेशन उभारणीचे काम रखडले असल्याचे या वेळी अधिकाऱ्यांनी सांगितले. पुण्यधाम कोंढवा ते कात्रज या विद्युत लाइनसाठी वाहतूक परवानगी मिळणे बाकी असल्याचेही स्पष्ट करण्यात आले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित विभागांना सात दिवसांत कार्यवाही करून अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या.

या वेळी महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर, महापालिका आयुक्त नवल किशोर राम, माजी महापौर दत्तात्रय धनकवडे, माजी नगरसेवक युवराज बेलदरे, मुख्य अभियंते अनिरुद्ध पावसकर, नंदकुमार जगताप, राष्ट्रीय महामार्ग कार्यकारी अभियंत्या श्रुती नाईक, उपअभियंता धनंजय गायकवाड, दिगंबर बांगर आदींसह नागरिक उपस्थित होते.

एका फोनवर सबस्टेशन मार्गी!

कात्रज येथील पाहणी दौऱ्यादरम्यान अजित पवार यांनी महावितरणचे मुख्य अभियंता यांना तत्काळ फोन करून 22 बाय 11 केव्ही सबस्टेशनचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले. त्यावर आयुक्त नवलकिशोर राम यांनी ‌‘एका आठवड्यात सहा गुंठे जागा उपलब्ध करून देऊ‌’, असे सांगितले. ‌‘हा प्रस्ताव लगेच पाठवा, तो मी मंजूर करून देतो. म्हणजे पंपिंग स्टेशन आणि कात्रज-आंबेगावचा विजेचा प्रश्नही सुटेल,‌’ असे या वेळी पवार यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT