सुपे: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनाने बारामतीसह दौंड, पुरंदर या तालुक्यांच्या सीमावर्ती भागातील शेतकऱ्यांना धक्का बसला. कधी काळी दुष्काळी म्हणून ओळखला जाणाऱ्या या परिसराला वरदान ठरलेल्या जनाई उपसा जलसिंचन योजनेसाठी दादांनी मोठे कष्ट केली. जिरायती भागाला पाणी देणारे दादा हरपले, अशी भावना या परिसरातून आपसूकच व्यक्त होऊ लागली आहे.
सुपे या भागाची जिरायती पट्टा म्हणून ओळख होती. या भागात माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या माध्यमातून सन 1992 च्या दरम्यान प्रथम जनाई उपसा जलसिंचन योजना अस्तित्वात आणली. मात्र, त्यानंतर खऱ्या अर्थाने अजित पवार यांनी या योजनेत लक्ष घालून जिरायती पट्ट्याचे रुपडे पालटले. योजना पूर्णत्वास येत असतानाच काही आंदोलने झाली. पण अजित पवार यांनी ही आंदोलने योग्य मार्गाने हाताळून योजनेचे कामे मार्गी लावली. त्यामुळे या परिसरात पाणी खेळल्याचे येथील शेतकरी सांगत आहेत.
मागील वर्षी बोरकरवाडीत बंदिस्त पाइप-लाइनचे भूमिपूजन होते. त्यावेळी पवारांनी जनाई योजनेच्या बंदिस्त पाइप-लाइनला शासनाने सुमारे 430 कोटी रुपये मंजूर केले आहेत. त्यामुळे ‘टेल टू हेड’ पाण्यासाठी बंदिस्त जलवाहिनी करून सर्वांना पाणी देण्याचा त्यांचा प्रयत्न होता. मात्र, यात दंडवाडी आणि खोपवाडी गावांचा विरोध आहे. त्यांच्यासाठी वॉल्व्ह काढून पाण्याचा पुरवठा केला जाईल, यासाठी एकत्र बसून मार्ग काढू असे पवार यांनी सांगितले होते.
तसेच निरा डावा कालव्याचा भाग सोडल्यास कऱ्हा नदी काठच्या भागातील शेतकऱ्यांचा जिरायती शब्द पुसण्यासाठी अजित पवार यांनी लक्ष घातले होते. त्यामुळे निरा-कऱ्हा हा नदी जोडप्रकल्प राबवण्याचे पवार यांचे स्वप्न होते. यासाठी सुमारे 1 हजार 25 कोटी खर्चाची योजना राबवित असल्याची माहिती पवार यांनी या कार्यक्रमात दिली होती. त्यामुळे या जिरायती भागातील 45 हजार एकर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे.
वीर धरणाच्या खालच्या बाजूकडून दोन टप्प्यात पाणी उचलले जाईल. पहिल्या टप्प्यात 2 हजार अश्वशक्तीचे दोन पंप तर दुसऱ्या टप्प्यात त्याच प्रमाणे पाणी उचलून कऱ्हा नदीत सोडण्यात येणार आहे. त्यमुळे या परिसरातील जिरायती भाग ओलिताखाली येऊन जिरायती शब्द पुसण्यास मदत होणार असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले होते.