पुणे: आता तरुणांना कृषी क्षेत्र उपलब्ध करून देण्याची गरज आहे. यासाठी नवनवीन तंत्रज्ञान शेतीत येऊन शेती शाश्वत झाली पाहिजे. यासाठी राज्य सरकार शेतीमधील कृत्रिम बुद्धिमत्तेला (एआय) प्रोत्साहन देत आहे.
कृषी क्षेत्रात अत्याधुनिक वापराबरोबरच हे तंत्रज्ञान शेतकर्यांना आत्मसात करण्यासाठी राज्यात सहा विभागांमध्ये प्रत्येकी एक ‘सेंटर फॉर इनोव्हेशन अॅन्ड डेव्हल्पमेंट इन स्मार्ट अॅग्रिकल्चर’ (सीडसा) उभारण्यात येतील, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.
पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुढाकारातून कृषी विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि कृषी महाविद्यालय यांच्या वतीने आयोजित केलेल्या पुणे आंतरराष्ट्रीय कृषी हॅकेथॉनचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते रविवारी झाले, त्या वेळी पवार बोलत होते. (Latest Pune News)
या वेळी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे, आमदार चेतन तुपे, बापू पठारे, बाबाजी काळे, कृषी आयुक्त सुरज मांढरे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, महापालिका आयुक्त नवलकिशोर राम, परभणी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्रामणी मिश्रा, माजी कृषी आयुक्त उमाकांत दांगट, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. राजाराम देशमुख, मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचे महासंचालक प्रशांत गिरबने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे आदी उपस्थित होते.
पवार म्हणाले की, एखाद्या समस्येवर मात करण्यासाठी विविध नावीन्यपूर्ण संकल्पना एकत्रित करून तिचे प्रभावी समाधान शोधले जाते. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात अशा प्रक्रियेला हॅकेथॉन असे म्हणतात. सीडसाचे अमरावती, नागपूर, नाशिक, पुणे, छत्रपती संभाजीनगर, कोकण विभागात केंद्र सुरू केले जातील. त्यासाठी 30 जून रोजी मांडण्यात येणार्या पुरवणी अर्थसंकल्पामध्ये 90 कोटी रुपयांची तरतूद केली जाईल.
शेतकरी विविध प्रयोग करून शेती करीत आहेत. शाश्वत शेती करताना रासायनिक खते आणि कीटकनाशकांच्या वापरांवर नियंत्रण आणत ग्राहकांना देखील दर्जेदार शेतमाल मिळाला पाहिजे, यासाठीही तंत्रज्ञानाचा वापर वाढला पाहिजे. यासाठीच्या तंत्रज्ञान वापराला सरकारचे पाठबळ आहे. तसेच, महात्मा फुले कृषी विद्यापीठामधील प्रयोगशाळा औंधमधील पशुसंवर्धन विभागाच्या प्रयोगशाळेच्या धर्तीवर अधिक संपन्न करण्यासाठी आवश्यक सुविधा, तंत्रज्ञानासाठी मदत केली जाईल.
कृषिमंत्री कोकाटे म्हणाले, भविष्यात कृषी क्षेत्रात मनुष्यबळाअभावी अडचणी निर्माण होणार आहेत. ही अडचण समजून कर्नाटकमध्ये 40 आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी एकत्र येत कृषी क्षेत्रातील मानवविरहित अवजारे आणि तंत्रज्ञान विकसित करीत आहेत. यामध्ये मानवरहित ट्रॅक्टर, मानवरहित ड्रोन आदी विविध तंत्रज्ञानाचा समावेश आहे.
प्रास्ताविकात जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी हे हॅकेथॉन आयोजनाचा उद्देश स्पष्ट करताना म्हणाले की, शेतकर्यांचे उत्पन्नवाढ, नवीन तंत्रज्ञानाची माहिती, शेतीविषयक समस्या व त्यावरील तांत्रिक उपाय, पाणीटंचाई, जमिनीचे व्यवस्थान उत्पादनात वाढ, या बाबींची माहिती शेतकर्यांना हॅकेथॉनमधून मिळेल. कृषी आयुक्त सुरज मांढरे, डॉ. राजाराम देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. महानंद माने यांनी आभार मानले.
मागच्या 100 वर्षांत मे महिन्यात एवढा पाऊस पडला नाही. बारामतीत सरासरी 14 इंच पाऊस पडतो. तो पाऊस मे महिन्यातच 13 इंच होऊन गेला. अशा हवामान बदलाच्या संकटात शेती आणि शेतकरी सापडला आहे.- अजित पवार, उपमुख्यमंत्री