पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसने पुणे शहरासाठी दोन अध्यक्षांची नियुक्ती केली आहे. पूर्व भागाची जबाबदारी माजी आमदार सुनील टिंगरे यांच्याकडे, तर पश्चिम भागाची जबाबदारी माजी सभागृह नेते सुभाष जगताप यांंच्याकडे सोपवण्यात आली आहे. याशिवाय नव्याने चार कार्याध्यक्षांची निवड करून जातीय समीकरणेही साधण्यात आले आहे.
दीपक मानकर यांनी राजीनामा दिल्याने गेल्या तीन आठवड्यांपासून शहराध्यक्षपद रिक्त होते. रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दोन्ही शहराध्यक्षांना निवडीचे पत्र दिले आहे. त्यानुसार माजी आमदार टिंगरे यांच्याकडे कसबा पेठ, पुणे कॅन्टोमेन्ट, वडगाव शेरी आणि हडपसर या पूर्व भागातील या विधानसभा मतदार संघाची जबाबदारी देण्यात आली आहे. (Latest Pune News)
त्यांच्या दिमतीला माजी नगरसेविका रूपाली पाटील आणि हाजी फिरोज शेख यांची कार्याध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे, तर जगताप यांच्याकडे पश्चिम भागातील पर्वती खडकवासला, कोथरूड व शिवाजीनगर या चार विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी असेल, त्यांच्या समवेत फेरनिवड करत प्रदीप देशमुख आणि माजी नगरसेवक अक्रुर कुदळे यांना कार्याध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार ह्या निवडी जाहीर केल्याचे आमदार चेतन तुपे यांनी सांगितले.
शहराध्यक्षपदासाठी माझ्यावर सोपविलेल्या जबाबदारीबद्दल मी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आभारी आहे. शहरात पक्ष संघटन वाढवून आगामी महापालिका निवडणुकीत पक्षाचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी मी प्रयत्न करेल. महायुतीत एकत्र निवडणूक लढविण्यासंबधीचा वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील, त्यानुसार आमची तयारी असेल.
-सुनील टिंगरे, शहराध्यक्ष.