पुणे: ज्यांच्या हातात नऊ वर्षे महापालिकेची सत्ता होती, त्यांनी ती खाली केली. त्यात एकही आणा शिल्लक ठेवला नाही. अशा स्थितीत ‘खिशात नाही आणा आणि मला बाजीराव म्हणा’, असे राज्याचे प्रमुख मला म्हणाले, हे बरे झाले. त्यांच्या मंडळींनीच सत्तेत असताना महापालिकेची तिजोरी रिकामी केली, हे त्यांनीच मान्य केले आहे. थोरले बाजीराव कर्तृत्ववान आणि पराक्रमी होते. त्यांनी मनगटाच्या जोरावर मराठा सामाज्य वाढवले. आमच्याही मनगटात ताकद आहे. आम्ही रिकाम्या तिजोरीत आणे आणू आणि मेट्रो व पीएमपी बस मोफत करण्याचे आश्वासन पूर्ण करू, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी मुख्यमंत्र्यांच्या टीकेची खिल्ली उडवली.
महापालिका निवडणुकीच्या प्रचाराची मंगळवारी सायंकाळी सांगता झाली. शिवाजीनगर येथील सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मोफत मेट्रो व बसप्रवासाच्या जाहीरनाम्यावर टीका केली होती. त्यानंतर सायंकाळी पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन त्याला उत्तर दिले.
पवार म्हणाले, आम्ही दिलेली आश्वासने ही उपकार किंवा दानधर्म नाहीत. ही केवळ निवडणुकपुरती आश्वासने नसून पुणे व पिंपरी-चिंचवड ही देशातील सर्वाधिक उत्पादनक्षम शहरे आहेत. ही शहरे मोठ्या प्रमाणावर संपत्ती निर्माण करतात व कर भरतात. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था हीच शहरे चालवतात. त्यामुळे येथील नागरिकांसाठी आम्ही जाहीर केलेल्या योजना त्यांच्या हक्काच्या आणि अधिकाराच्या आहेत. आमचा जाहीरनामा पैसा उधळण्यासाठी नाही, तर लोकांनी भरलेला कर योग्य स्वरूपात त्यांना परत मिळावा, हा त्यामागील उद्देश आहे.ऐराष्ट्रवादी काँग््रेासने दिलेल्या आश्वासनांबाबत दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मोफत मेट्रो व बस प्रवासाच्या घोषणा अशक्य असल्याचे किंवा बेजबाबदार वक्तव्य असल्याची टीका केली जात आहे. मी दुर्लक्ष करू शकलो असतो; मात्र लोकप्रतिनिधी म्हणून थेट जनतेशी बोलणे ही माझी जबाबदारी आहे, असेही पवार यांनी सांगितले.
युती सरकारने सिंचनासाठी खर्च वाढवला
1999 मध्ये आघाडीचे सरकार आल्यानंतर कृष्णा खोरे महामंडळाची जबाबदारी माझ्याकडे आली. आधीच्या सरकारच्या काळात पुरंदर उपसा सिंचन योजनेचा खर्च 330 कोटी दाखवण्यात आला होता. मी तो कमी करून 220 कोटींवर आणला. त्यातील 100 कोटी पक्षनिधीसाठी आणि 10 कोटी अधिकाऱ्यांनी वाढवले होते, असे मला सांगण्यात आले. ही फाइल आजही माझ्याकडे आहे. हे प्रकरण बाहेर आले असते तर मोठा हाहाकार माजला असता,’ अशी टीका अजित पवार यांनी 1995 च्या युती सरकारवर केली.
अजित पवार कोण?’ हा प्रश्न स्वतःला विचारा
‘मेट्रो आणि बससेवा मोफत करण्याचे आश्वासन कसे पूर्ण करणार, असा प्रश्न विचारणाऱ्यांनी आधी ‘अजित पवार कोण?’ हा प्रश्न स्वतःला विचारावा. मी राज्याचा अर्थसंकल्प अकरा वेळा सादर केला आहे. आर्थिक नियोजन कसे करायचे, हे मला माहीत आहे. मेट्रो आणि पीएमपी मोफत करण्याचा निर्णय मी तज्ज्ञांशी चर्चा करून घेतला आहे. केवळ कर वसूल करणे हे महापालिकेचे काम नसून नागरिकांना सोयीसुविधा आणि सेवा देणेही तितकेच महत्त्वाचे आहे. मेट्रोची क्षमता असताना वापर कमी होतो. पुण्यातील रस्त्यांवरील गर्दी कमी व्हावी आणि लोकांनी लवकर घरी पोहोचावे, असे विरोधकांना वाटत नाही का?’ असे पवार यांनी सुनावले. वाहतूक कोंडीमुळे नागरिकांचे सुमारे 7,200 कोटी रुपयांचे नुकसान आणि वायूप्रदूषण होत आहे. त्याऐवजी केवळ 216 कोटी खर्च करून या सेवा मोफत देता येतील,’ असा दावाही त्यांनी केला.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग््रेास आघाडी बहुमताचा आकडा गाठेल. सत्तेसाठी आम्हाला कोणाचीही गरज भासणार नाही. दोन्ही महापालिकांमध्ये राष्ट्रवादी काँग््रेासचाच महापौर असेलअजित पवार, उपमुख्यमंत्री