दूध भेसळखोरांना अटकाव घालण्यासाठी हिवाळी अधिवेशनात कायदा करू: अजित पवार Pudhari
पुणे

Milk Adulteration: दूध भेसळखोरांना अटकाव घालण्यासाठी हिवाळी अधिवेशनात कायदा करू: अजित पवार

गाय-म्हशीच्या गुणवत्तापूर्ण दुधाची विक्री करण्यावर भर देऊन ग्राहकांचा विश्वास संपादन करण्याची आवश्यकता असल्याचेही ते म्हणाले.

पुढारी वृत्तसेवा

पुणे: राज्यात दूध भेसळखोरांना अटकाव घालण्यासाठी येत्या हिवाळी अधिवेशनात कठोर कायदा करण्याचे सूतोवाच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे केले. लहान मुलांपासून सर्वच जण दूध पितात आणि भेसळीने आरोग्याचे प्रश्न निर्माण होऊ शकतात. त्यामुळे गाय-म्हशीच्या गुणवत्तापूर्ण दुधाची विक्री करण्यावर भर देऊन ग्राहकांचा विश्वास संपादन करण्याची आवश्यकता असल्याचेही ते म्हणाले.

पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची (कात्रज दूध) 66 वी वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवारी (दि. 26) मुख्यालयात झाली. या वेळी व्यासपीठावर आमदार शंकर मांडेकर, माजी आमदार अतुल बेनके यांच्यासह संघाचे अध्यक्ष ॲड. स्वप्निल ढमढेरे, उपाध्यक्ष मारुती जगताप व सर्व संचालक मंडळ उपस्थित होते. (Latest Pune News)

या वेळी अजित पवार यांच्या हस्ते कात्रज दूध संघाच्या नवीन स्वयंचलित दूध व दुग्धजन्य पदार्थ प्रकल्प, कात्रजचा दूध व दुग्धजन्य पदार्थांचा मिनी मॉल, कात्रज डेअरी प्रॉडक्ट रिबांडिंग, ईशान्वी हनी व ड्रोन इत्यादीचे डिजिटल पद्धतीने उद्घाटन करण्यात आले. त्या वेळी पवार हे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर बांगर यांनी पवार यांना व्यासपीठावर जाऊन निवेदन देत संकरित भाकड जनावरे, संकरित जर्सी गायीचे गोऱ्हे यांची खरेदी-विक्री बंद होऊन आठवडे बाजार बंद झाल्याबाबत तसेच दुधातील भेसळ रोखण्याबाबतचे निवेदन देत चर्चा केली होती. तोच धागा पकडत भेसळखोरांवर कारवाईसाठी कायदा करण्याचे आणि येत्या कॅबिनेटच्या बैठकीत या विषयावर चर्चा व निर्णय घेण्यात येईल, असे पवार म्हणाले.

कात्रज दूध संघाने दूधसंकलन सध्या 1.90 लाख लिटर इतके आहे. ते वाढविण्यासह दूध विक्री वाढवावी. संघाच्या उपपदार्थांचा दर्जा चांगला असल्याने सर्वत्र कौतुक होत असून, संचालक मंडळाचे मी अभिनंदन करतो. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतींशी मी बोललो असून, तेथे कात्रज दूध संघास एक स्टॉल देण्याबाबत सांगितले आहे.

त्याच पद्धतीने इतरही ठिकाणी ते उपलब्धतेसाठी मदत केली जाईल. मात्र, संघाचे अध्यक्ष ढमढेरे व संचालकांनी ग्राहकांना दूध व उपपदार्थांच्या पुरवठ्याचे नियोजन करावे. संचालकांनी आपापसांत ग्रुपिनिझम करू नका, पारदर्शक काम करून शेतकऱ्यांना न्याय देण्याचा सल्लाही पवार यांनी दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT