

नारायणगाव: कुमशेत (ता. जुन्नर) येथे दोन दिवसांपूर्वी बिबट्याच्या हल्ल्यात सिद्धार्थ केदारी हा सहा वर्षाचा बालक ठार झाला आहे. या हल्ल्याने वन खाते खडबडून जागे झाले आहे.
या नरभक्षक बिबट्याला पकडण्यासाठी 10 पिंजरे, सहा ड्रोन कॅमेरे, पाच कॅमेरे व 25 कर्मचाऱ्यांची फौज तैनात करण्यात आली आहे. बिबट्या पिंजऱ्याच्या परिसरात फिरून जातो. परंतु, तो जेरबंद होत नाही, असे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.(Latest Pune News)
जुन्नर तालुक्यामध्ये बिबट्या व मानव संघर्ष पुन्हा सुरू झाला आहे. बिबट्याचे हल्ले पुन्हा वाढू लागले आहेत. त्यामुळे जुन्नर तालुक्यात गावोगावी दहशतीचे वातावरण आहे. बिबट्याच्या दर्शनामुळे शेतकऱ्यांना शेतामध्ये काम करणे अवघड होऊन बसले आहे. दरम्यान, तीन दिवसांपूर्वी कुमशेत या ठिकाणी दोन दिवसांपूर्वी सिद्धार्थ केदारी या मुलाला बिबट्याने राहत्या घरातून उचलून नेले.
त्यात त्याचा मृत्यू झाला आहे. या परिसरात या नरभक्षक बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाने संपूर्ण यंत्रणा कामाला लावली आहे. परंतु, बिबट्या काही पिंजऱ्यात जेरबंद होत नाही.
बिबट्याचा उपद्रव वाढल्याने व पाळीव प्राणी व मानवावर हल्ला वाढला आहे. त्यामुळे जनतेचा आक्रोश वाढू लागला आहे. मोठ्या संख्येने वाढलेल्या बिबट्याचा बंदोबस्त कसा करायचा? याबाबत वन खातेदेखील हतबल झाले आहे.
दरम्यान, जुन्नर तालुक्यात बिबट्याचे हल्ले मानवावर होऊ लागल्याने तालुक्यातील जनतेचा उद्रेक वाढला आहे. कायमस्वरूपी बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी व शासनाचे याकडे लक्ष वेधण्यासाठी 30 सप्टेंबरला जुन्नर या ठिकाणी या विषयावर सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केल्याची माहिती आमदार शरद सोनवणे यांनी दिले.
ते म्हणाले, घटना घडल्यावर दुसऱ्या दिवशी मी घटनास्थळी भेट देऊन सिद्धार्थ केदारी यांच्या नातेवाईकांचे सांत्वन केले आहे. माजी आमदार अतुल बेनके, भाजप नेते आशाताई बुचके, वन विभागाचे उपवनसंरक्षक प्रशांत खाडे, सहाय्यक उपवनसंरक्षक स्मिता राजहंस, वनक्षेत्रपाल प्रदीप चव्हाण यांची एकत्रित बैठक झाली. त्यात 30 सप्टेंबर रोजी सर्वपक्षीय बैठक घेऊन बिबट्यासंदर्भात कायमस्वरूपी उपाययोजना करण्याबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.