पुणे: आरोग्याच्या कोणत्याही तक्रारी उद्भवल्यास डॉक्टरांकडे जाण्याऐवजी गुगल किंवा एआय-आधारित साधनांचा सल्ला घेण्याकडे नागरिकांचा वाढता कल चिंताजनक असल्याचा इशारा डॉक्टरांनी दिला आहे. चुकीची माहिती, अर्धवट निदान आणि उपचारातील विलंबामुळे गंभीर परिणाम होऊ शकतात, असे तज्ज्ञांचे मत आहे.
कोरोना काळात सर्वसामान्यांचे स्वत:च्या मर्जीने औषधे घेण्याचे प्रमाण वाढले आहे. डॉक्टरांकडून तपासणी करून न घेता केमिस्टकडून परस्पर औषधे खरेदी केली जातात. त्यातच आता वैद्यकीय सल्ल्यासाठी एआयचा वापर करण्याचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे.
सर्दी, ताप, वेदना किंवा इतर लक्षणे दिसल्यानंतर नागरिक प्रथम इंटरनेटवर माहिती शोधत असल्याचे निरीक्षण समोर आले आहे. विशेषतः जेमिनी, चॅट जीपीटीसह विविध हेल्थ ॲप्स आणि सर्च इंजिनवर आधारित ’सेल्फ-डायग्नोसिस’ची प्रवृत्ती वाढत आहे. यामुळे अनेक वेळा साध्या आजाराचे गंभीर रूप धारण होईपर्यंत योग्य उपचार मिळत नाहीत.
जनजागृती मोहीम राबवण्याची गरज
इंडियन मेडिकल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले, की डिजिटल साधनांचा वापर माहिती मिळवण्यासाठी उपयुक्त असला तरी निदान आणि उपचारासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला अत्यावश्यक आहे. ग््राामीण भागात डॉक्टरांची उपलब्धता कमी असल्यामुळेही नागरिक एआयकडे वळत असल्याचे दिसते. राज्याच्या आरोग्य विभागानेही या पार्श्वभूमीवर जनजागृती मोहीम राबविण्याची गरज व्यक्त केली आहे. ’स्वतः निदान’ करण्याऐवजी लक्षणे दिसताच जवळच्या आरोग्य केंद्रात तपासणी करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
धोके कोणते?
चुकीचे किंवा अर्धवट निदान प औषधांचा चुकीचा वापर प गंभीर आजाराचे उशिरा निदान प मानसिक तणावात वाढ
आकडे काय सांगतात?
सुमारे 35% प्रौढ नागरिक आरोग्यविषयक माहिती व सल्ल्यासाठी एआय साधनांचा वापर करतात, एआय सिम्पटम मेकर सर्चमध्ये 134% वाढ- लोक स्वतः निदान करण्याकडे वळत असल्याचे संकेत प एआय डॉक्टर सर्चमध्ये 129% वाढ - डिजिटल सल्ल्यावरील वाढता विश्वास एआय वापरणाऱ्यांपैकी 32% लोक डॉक्टरांकडे जाणे पुढे ढकलतात.
इंटरनेटवरील माहिती सर्वसाधारण स्वरूपाची असते; मात्र प्रत्येक रुग्णाची प्रकृती, वैद्यकीय इतिहास आणि जोखीम वेगळी असते. त्यामुळे एआय किंवा गुगलवर आधारित सल्ला अंतिम मानणे धोकादायक ठरू शकते. काही प्रकरणांमध्ये चुकीच्या औषधोपचारामुळे दुष्परिणामही वाढल्याचे उदाहरणे पुढे येत आहेत.- डॉ. संजय पाटील, अध्यक्ष, हॉस्पिटल असोसिएशन ऑफ इंडिया, पुणे शाखा