एआय म्हणतंय, 4 लाख 90 हजार वारकरी आले पुण्यात File Photo
पुणे

Wari 2025: एआय म्हणतंय, 4 लाख 90 हजार वारकरी आले पुण्यात

पुणे पोलिसांकडून पालखी सोहळ्यात सहभागींची आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने मोजणी

पुढारी वृत्तसेवा

पुणे: दरवर्षी आळंदी, देहू येथून लाखोंच्या संख्येने वारकरी पायी दिंडीत सहभागी होतात. मात्र, नेमके किती वारकरी यात सहभागी झाले होते, याची माहिती मिळत नाही. यंदा पहिल्यांदा वारकर्‍यांची संख्या अचूकपणे मोजण्यासाठी पुणे पोलिसांनी एक अभिनव पाऊल उचलले. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाच्या साहाय्याने मोजणी केली.

संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्यांसोबत तब्बल चार लाख 90 हजार वारकरी पुण्यात दाखल झाले. तुकोबांच्या पालखीसोबत एक लाख 95 हजार, तर ज्ञानोबांच्या पालखीसोबत दोन लाख 95 हजार वारकरी शहरात आले होते. (Latest Pune News)

कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाच्या साहाय्याने गर्दीचे व्यवस्थापन, संख्येचे विश्लेषण आणि वाहतुकीचे नियोजन करण्यात आले. पोलिसांनी विविध ठिकाणी कॅमेरे आणि विशिष्ट सॉफ्टवेअरचा वापर करून वारकर्‍यांची संख्या मोजली. एआय प्रणालीचे यंत्र शहरात दोन्ही पालख्या दाखल होण्याच्या आणि शहरातून बाहेर जाण्याच्या मार्गावर बसविण्यात आले होते.

20 जून रोजी संत तुकाराम महाराज पालखी पुण्यात पोहचली. त्यांच्यासोबत 1.95 लाख भाविक आणि सुमारे 600 वाहने शहरात आली. त्याच दिवशी संत ज्ञानेश्वर महाराज पालखीही पुण्यात दाखल झाली. त्यांच्यासोबत तब्बल 2.95 लाख वारकरी आणि 2 हजार वाहने पुण्यात दाखल झाली होती.

वारीचे नियोजन अधिक सुस्थित करण्यासाठी काही वारकरी पुढे निघाले होते. 20 व 21 जून रोजी एकत्रित 1.5 लाख भाविक पुण्यातून पुढे प्रस्थान केले होते. त्यानंतर 22 जून रोजी दोन्ही पालख्या शहरातून प्रस्थान करत असताना 2.8 लाख वारकरी पुण्यातून बाहेर पडले. त्यांच्यासोबत 1,800 वाहनेही होती.

‘एआय’चा परिणामकारक वापर

ही संपूर्ण मोजणी एआय प्रणालीद्वारे करण्यात आली. पोलिसांनी वापरलेल्या या तंत्रज्ञानामुळे गर्दीचे अचूक व्यवस्थापन, मार्ग नियोजन, वाहतूक नियंत्रण आणि आपत्कालीन उपाययोजना यांमध्ये मोठी मदत झाली. वारीदरम्यान पुणे शहरात गर्दीचे योग्य नियोजन, सुरक्षितता आणि वाहतूक नियंत्रण योग्य प्रकारे झाले, असे वरिष्ठ अधिकार्‍यांचे मत आहे.

वारीचा प्रचंड जनसागर लक्षात घेता, पारंपरिक उपाय पुरेसे ठरणार नव्हते. त्यामुळे एआयचा वापर करून आम्ही वेळेआधी नियोजन, प्रत्यक्षात अंमलबजावणी आणि नंतर विश्लेषण, या तीन पातळीवर यशस्वी कामगिरी केली.
- अमितेश कुमार, पोलिस आयुक्त

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT