AI In Animation Pudhari
पुणे

AI In Animation: ॲनिमेशन क्षेत्रात एआयची क्रांती! चित्रांपासून व्हिडिओपर्यंत निर्मिती वेगवान; तरुणांसाठी नव्या संधी

जागतिक ॲनिमेशन दिनानिमित्त तंत्रज्ञानातील बदलांचा आढावा; एआयमुळे वेळ आणि खर्चात बचत, मात्र कलाकारांची कल्पकता आजही महत्त्वाची

पुढारी वृत्तसेवा

सुवर्णा चव्‍हाण

पुणे: काल्पनिक जंगल, ऐतिहासिक वास्तू आणि कल्पनेतील पात्रे रेखाटण्यापासून ते चित्रपट, जाहिराती, गेमिंग आणि शैक्षणिक व्हिडिओ तयार करण्यापर्यंत ॲनिमेशन क्षेत्रात पूर्वी बराच वेळ आणि मेहनत घ्यावी लागत असे. आता या क्षेत्रातही कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) तंत्रज्ञानाचा वापर वाढत असून, चित्रे तयार करणे, पात्रांना हालचाली देणे सोपे झाले आहे. एआयमुळे कामाच्या पद्धती बदलत असून, चित्रपट, जाहिराती, गेमिंग आणि डिजिटल माध्यमांत नव्या संधी निर्माण होत आहेत. मात्र, दृश्यांना सर्जनशील रूप देण्यासाठी आणि पात्रांच्या माध्यमातून भावना व्यक्त करण्यासाठी कलाकारांचे कौशल्य आजही महत्त्वाचे ठरत आहे.

दरवर्षी २८ ऑक्टोबर रोजी जागतिक ॲनिमेशन दिवस साजरा केला जातो. बुधवारी (दि. २८) हाच दिवस असल्याने त्यानिमित्ताने ॲनिमेशन क्षेत्रातील बदलांचा आढावा घेतला असता, एआयमुळे चित्रनिर्मिती आणि व्हिडीओ तयार करण्याची प्रक्रिया सोपी झाल्याचे दिसून आले. पूर्वी चित्रांसाठी संदर्भ शोधणे, रेखाचित्रे काढणे आणि त्यात वारंवार बदल करणे आवश्यक होते. आता एआयच्या मदतीने कमी वेळेत अनेक पर्याय तयार करता येतात. पात्रांच्या हालचाली, पार्श्वभूमी आणि चित्रांपासून व्हिडीओ तयार करणे शक्य होत आहे. यासाठी रनवे, ॲडोबी फायरफ्लाय, पिका आणि क्लिंग एआय यासारख्या साधनांचा वापर केला जातो.

त्यामुळेच ॲनिमेशन क्षेत्रात एआयचा वापर वाढला आहे. अनेक ॲपही उपलब्ध असल्याने चित्रांपासून ते गेमिंगपर्यंत... कार्टुन्सपासून ते व्हिडिओ तयार करण्यापर्यंत एआयचे तंत्रज्ञान वापरले जात आहे. म्हणूनच ॲनिमेशन क्षेत्रातील तरुणांकडून एआयचा वापर वाढला आहे. विशेष म्हणजे ॲनिमेशन कंपन्यांबरोबरच काही शैक्षणिक संस्थांमध्येही ॲनिमेशनमध्ये एआयचा वापर शिकविणारे अभ्यासक्रम सुरू केले आहेत. चित्रपट, जाहिराती, गेमिंग आणि डिजिटल माध्यमांत या तंत्रज्ञानाच्या मदतीने नवे प्रयोगही करता येत आहेत.

त्यामुळे संकल्पना कमी वेळेत प्रत्यक्षात आणणे शक्य होत आहे. म्हणूनच ॲनिमेशन क्षेत्रात एआयने तरुणांसाठी नवीन संधीही निर्माण केल्या आहेत. याविषयी व्यंग्यचित्रकार घनश्याम देशमुख म्हणाले, एआयमुळे चित्रकारांना अनेक नवी साधने मिळाली आहेत. प्रत्यक्ष न पाहिलेल्या ठिकाणांचीही कल्पनेनुसार चित्रे तयार करता येतात. पात्रांच्या हालचाली, पार्श्वभूमी आणि पुस्तकांसाठी चित्रे तयार करण्यासाठी एआयची मदत होते. त्यामुळे कमी वेळेत वेगवेगळे प्रयोग करता येतात. मात्र, असे असले तरी चित्रकाराची कल्पकता आवश्यक आहे.

पूर्वी एक मिनिटाचे दर्जेदार ॲनिमेशन तयार करण्यासाठी अनेक कलाकारांना कित्येक दिवस मेहनत घ्यावी लागत असे. आज एआयमुळे हेच काम अधिक वेगाने, कमी खर्चात आणि प्रभावीपणे करता येऊ लागले आहे. रनवे, अ‍ॅडोबी फायरफ्लाय, पिका, क्लिंग एआय, कॅनव्हा एआय आणि सोरा यांसारखी साधने चित्रांना गती देणे, पात्रनिर्मिती, दृश्यरचना, व्हिडिओ निर्मिती आणि विशेष प्रभाव साकारण्यासाठी उपयुक्त ठरत आहेत. एआयमुळे उत्पादकता वाढत असून, चित्रपट, जाहिरात, शिक्षण, गेमिंग आणि डिजिटल माध्यमांत नव्या संधी निर्माण होत आहेत. छोट्या उद्योगांनाही जागतिक दर्जाची निर्मिती शक्य होत आहे. मात्र, एआय हा कलाकाराचा पर्याय नसून, त्याचा बुद्धिमान सहायक आहे. कल्पनाशक्ती, सर्जनशीलता, संवेदनशीलता आणि कथाकथन ही मानवी कौशल्येच खरी संपत्ती आहेत, असे ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूर यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT