Pune AI conference Pudhari
पुणे

AI Era Human Resources India: एआय युगातील मनुष्यबळावर विश्वकर्मा विद्यापीठात राष्ट्रीय पूर्व शिखर परिषद

धोरणकर्ते, उद्योगजगत व शिक्षणतज्ज्ञांचा सहभाग; समावेशक आणि जबाबदार एआयवर चर्चा

पुढारी वृत्तसेवा

पुणे: कृत्रिम बुद्धिमत्ता वेगाने अर्थव्यवस्था, आस्थापना आणि शिक्षण व्यवस्था बदलत असताना, विश्वकर्मा विद्यापीठाच्यावतीने ‌‘एआय युगातील मनुष्यबळ‌’ या विषयावर अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद तसेच प्रमुख शैक्षणिक, औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्राच्या सहकार्याने एआय पूर्व शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले.

या परिषदेत धोरणकर्ते, उद्योजक जगतातील वरिष्ठ अधिकारी , शिक्षणतज्ज्ञ, तंत्रज्ञान व्यावसायिक आणि विद्यार्थी सहभागी झाले होते. समावेशक आणि जबाबदार एआय स्वीकारासाठी भारताचे मनुष्यबळ कसे सक्षम करता येईल, यावर या परिषदेत चर्चा करण्यात आली.

उद्घाटनपर भाषणात विश्वकर्मा विद्यापीठाचे अध्यक्ष भरत अगरवाल यांनी तंत्रज्ञान प्रगतीमध्ये मानवी घटकाचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले, मानवी भांडवल गुंतवणूक आकर्षित करते आणि पायाभूत सुविधा व प्रशासनाच्या मर्यादा असतानाही शहरांचा विकास घडवून आणते. एआय युगात उद्योग व्यावसायिक, शिक्षणतज्ज्ञ आणि विद्यार्थी हे सर्वजण एकाच वेळी शिकत आहेत. आणि कधी कधी विद्यार्थी शिक्षकांपेक्षा अधिक जाणतात.

अभियांत्रिकी नसलेल्या क्षेत्रांसह सर्वच व्यावसायिक क्षेत्रांवर एआयचा प्रभाव पडत आहे आणि ते आत्मसात करण्याची गती वाढवणे ही आपली जबाबदारी आहे. पुणे शहर मानवी प्रतिभेच्या विकासामुळे सातत्याने प्रगती करत आहे, असे त्यांनी सांगितले.

मुख्य भाषणात तंत्रज्ञान परिषदेचे प्रशिक्षण व अध्ययन विभागाचे संचालक डॉ. सुनील लुथा यांनी एआय विषयक चर्चेचे राष्ट्रीय आणि जागतिक महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले, फेबुवारी 2026 मध्ये भारत ‌’एआय इम्पॅक्ट समिट‌’चे आयोजन करणार असून, एआयचा उपयोग समावेशक मानवी विकास, सामाजिक सक्षमीकरण आणि शाश्वत प्रगतीसाठी कसा करता येईल, यावर भविष्योन्मुख जागतिक अजेंडा मांडण्यात येणार आहे. यावेळी रोहित रामानंद, मनीष तांबे, रजनीकांत बेहरा आदी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमामुळे विकसित भारत 2047 या राष्ट्रीय दृष्टिकोनाशी सुसंगत पुण्याचे शिक्षण, नवोपक्रम आणि विचार नेतृत्वाचे केंद्र म्हणून असलेले स्थान अधोरेखित झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT