Cartoon Generation Pudhari
पुणे

AI Cartoon Generation Impact: एआयमुळे व्यंग्यचित्र निर्मितीत नवा बदल; पण कलाकारांची सर्जनशीलता अजूनही टिकून

तंत्रज्ञानामुळे व्यंग्यचित्रे तयार करणे सोपे झाले असले तरी कल्पकता, विनोद आणि शैली ही मानवी कलाकारांची खरी ताकद असल्याचे तज्ज्ञांचे मत

पुढारी वृत्तसेवा

सुवर्णा चव्हाण

पुणे: पर्यावरणावर आधारित व्यंग्यचित्र तयार करून करण्याची कमांड अर्चनाने चॅट जीपीटीला दिली अन्‌‍ काही सेकंदांत तिच्यासमोर समर्पक व्यंग्यचित्र आले. आजच्या डिजिटल युगात कृत्रिम बुद्धिमत्तेने (एआय) व्यंग्यचित्रांच्या दुनियेतही एआयने शिरकाव केला आहे.

‌‘एआय‌’मुळे व्यंग्यचित्रनिर्मितीचा वेग वाढला असून, सोशल मीडियासाठी युवा व्यंग्यचित्रकारांकडून एआय वापर वाढत आहे. एकीकडे ही नवोदितांसाठी ही संधी मोठी मानली जात आहे. पण, स्वत:च्या चित्र आणि विनोदी शैलीतून व्यंग्यचित्र रेखाटण्यातच जिवंतापणा असून, यानुसार जे व्यंग्यचित्र रेखाटतात त्यांच्या कलेवर एआयचा कोणताही परिणाम होणार नसल्याचे अनुभवी व्यंग्यचित्रकार सांगतात. मंगळवारी (दि. 5) साजऱ्या होणाऱ्या जागतिक व्यंग्यचित्रकार दिनानिमित्त दै. ‌‘पुढारी‌’ने अनुभवी व्यंग्यचित्रकारांशी साधलेल्या संवादात व्यंग्यचित्रांच्या दुनियेत एआयचा वापर वाढत असल्याचे त्यांनी सांगितले.

पूर्वी एखाद्या सामाजिक किंवा राजकीय विषयावर व्यंग्यचित्र तयार करण्यासाठी व्यंग्यचित्रकाराला संकल्पना, रेखाटन, संपादन, अशा अनेक टप्प्यांतून जावे लागे. आता एआयवर आधारित साधनांमुळे केवळ काही शब्द टाइप करून कल्पना प्रत्यक्षात उतरवणे शक्य झाले आहे.

व्यंग्यचित्रकार घनश्याम देशमुख म्हणाले की, सोशल मीडियासाठी आणि जाहिरातींसाठी एआयचा वापर वाढत आहे. तंत्रज्ञानाचा फायदा असला तरी अतिवापर टाळायला हवा. आर. के. लक्ष्मण, बाळासाहेब ठाकरे, शि. द. फडणीस यांच्यासारख्या अनेक दिग्गजांची शैली एआय तयार करू शकत नाही. कारण व्यंग्यचित्रातील विनोद, मांडणी आणि शैली ही प्रत्येक कलाकाराची स्वतंत्र ओळख असते आणि ती कायम राहणार आहे.

व्यंग्यचित्राच्या क्षेत्रात नक्कीच ‌‘एआय‌’चा वापर वाढला आहे. पण, ज्यांच्याकडे विनोदी शैली, संकल्पना, चित्रशैली आहे, त्या व्यंग्यचित्रकारांच्या कलेवर याचा कोणताही परिणाम होणार नाही. कला आणि कल्पना असे व्यंग्यचित्रकलेचे दोन भाग असतात. यामुळे एक चांगले व्यंग्यचित्र तयार होते. ‌‘ए आय‌’ हा व्यंग्यचित्रात कलेचा भाग जोडून देऊ शकतो. पण, कल्पनेचा भाग आणि विनोदी शैली व्यंग्यचित्रात आणणे हे व्यंग्यचित्रकारालाच जमते. त्यामुळे व्यंग्यचित्रकाराने रेखाटलेल्या व्यंग्यचित्राचे महत्त्व नेहमीच टिकेल.
चारुहास पंडित, व्यंग्यचित्रकार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT