पुणे: शेतकर्यांच्या शेतात नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यास प्राधान्य देण्याबरोबरच नवे तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करून एक चांगले काम करण्याचा माझा प्रयत्न असेल. केंद्र सरकारचा कृषी योजनांना अधिकाधिक पैसा महाराष्ट्राला आणण्यास प्राधान्य देऊन राज्यातल्या शेतकर्यांसाठी योजनांच्या यशस्वी अंमलबजावणीद्वारे त्याचा कसा फायदा होईल, यावर मी लक्ष केंद्रित करणार असल्याची माहिती राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील कृषी विभागाच्या आढावा बैठकीनंतर शनिवारी (दि. 2) दुपारी ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल व महायुतीच्या प्रमुख नेत्यांनी कृषिमंत्रिपदाची मोठी जबाबदारी माझ्यावर दिलेली आहे. (Latest Pune News)
कृषीमध्ये वेगवेगळी आव्हाने असून, मीसुद्धा एक शेतकर्याचा मुलगा असल्याने मला अडचणी, प्रश्न माहिती आहेत. शेतकर्यांचे हित कोणत्या निर्णयाने साधले जाणार आहे, हे माहिती असल्याने मी शेतकर्यांना न्याय देण्याची माझी भूमिका राहणार आहे.
शेतकर्यांच्या चेहर्यावर आनंद कसा दिसेल, यास माझे प्राधान्य देणार आहे. कृषी खात्याची मोठी जबाबदारी आहे. संपूर्ण राज्यात मला फिरावे लागणार असून, प्रत्येक विभागाच्या वेगवेगळ्या अडचणी आहेत. त्या सोडविण्यास माझे प्राधान्य राहणार आहे. शेतकर्यांच्या भल्यासाठी जे काही करता येईल ते करू.