पुणे: एरंडवणे आणि नीलायम थिएटर परिसरात झाडाच्या धोकादायक फांद्या कोसळून दोन नागरिकांचा मृत्यू झाल्यानंतर महानगरपालिकेच्या उद्यान विभागाला जाग आली आहे. शहरातील धोकादायक झाडांच्या फांद्या तोंडण्यास सुरुवात करण्यात आली असून, सर्व 309 प्रस्ताव निकाली काढल्याचा दावा करण्यात आला आहे.
गेल्या दोन महिन्यांत शहरातील 748 ठिकाणी झाडांची किंवा फांद्यांची छाटणी केल्याची माहिती देखील उद्यान विभागाने दिली आहे. शहरात धोकादायक झाडे व फांद्यांबाबत तक्रारी करूनही महापालिकेचा उद्यान विभाग वेळेत कारवाई करीत नाही, अशी नागरिकांची तक्रार आहे. (Latest Pune News)
त्यामुळे अनेक प्रकरणे लांबणीवर पडत होते. झाड तोंडण्यास उशिरा परवानगी मिळत असल्याने त्यावर उपाय म्हणून महापालिकेने हे अधिकार क्षेत्रीय कार्यालयांच्या समितीकडे विकेंद्रित केले. मात्र, त्यानंतरही परवानगी प्रक्रियेत विलंब होत होता. याबाबत देखील नागरिकांनी अनेक तक्रारी केल्या होत्या.
गेल्या महिन्यात एरंडवणे आणि नीलायम थिएटर येथे झालेल्या दोन अपघातांमुळे दोघांचे जीव गेले. यामुळे महापालिकेवर जोरदार टीका झाली. त्यानंतर जागे झालेल्या उद्यान विभागाने 349 ठिकाणी झाडांची फांदीछाटणी, तर 439 ठिकाणी धोकादायक फांद्या काढून टाकण्यात आल्याची माहिती दिली आहे.
या फांद्या काढण्यासाठी परवानगी मिळण्यासाठी सहा सहा महिने वाट पाहावी लागते. त्यामुळे काही सोसायट्या परवानगी न घेताच झाडे किंवा फांद्या कापतात. मात्र, त्यानंतर काही तथाकथित समाजसेवक किंवा माहिती अधिकार कार्यकर्ते अशा झाडांचे फोटो काढून तक्रारी दाखल करण्याची भीती दाखवत ब्लॅकमेलिंग करतात, अशी तक्रार काही रहिवाशांनी बोलून दाखवली आहे. तसेच. यावर पालिकेने कारवाई करण्याची देखील मागणी करण्यात आली आहे.
शहरात धोकादायक झाडे व फांद्या तोंडण्याबाबत पालिकेच्या उद्यान विभागाकडे तक्रारी आल्या होत्या. त्यावर तातडीने कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार कारवाई करण्यात येत आहे. उद्यान विभागाच्या कर्मचार्यांनी शहरातील धोकादायक झाडांच फांद्या काढण्यास सुरुवात केली आहे.- ओमप्रकाश दिवटे, अतिरिक्त आयुक्त, महानगरपालिका