नानगाव: गेल्या अनेक वर्षांपासून दौंड आणि शिरूर तालुक्यात बिबट्यांचा अधिवास आहे. त्यामुळे दोन्हीही तालुक्यांतील परिस्थिती बिबट्यांच्या वावरामुळे भीतीदायक झाली आहे. त्यातच आता गव्यांचे नवे संकट समोर उभे ठाकले आहे. त्यामुळे दौंड आणि शिरूर तालुक्यातील नागरिक व शेतकर्यांना सध्या दुहेरी संकटाला तोंड द्यावे लागत आहे.
बिबट्यांचा वावर आणि दिवसेंदिवस जनावरांसह माणसांवर होणारे हल्ले यामुळे नागरिक भीतीच्या छायेत आहेत. त्यातच आता गव्याच्या नव्या संकटामुळे सर्वांचीच झोप उडाली आहे. बिबट्यांचे डोक्यावरील संकट दिवसेंदिवस काळजाचा थरकाप उडवणारे ठरत असताना आता काळजाचे पाणी करणारे संकट सध्या दौंड आणि शिरूर तालुक्यातील नागरिकांपुढे मोठे संकट म्हणून उभे आहे. (Latest Pune News)
डोंगर भागात व जंगल परिसरात मनुष्यवस्ती विरळ असते. त्यामुळे अशा भागात वन्यप्राण्यांची भीती कमी असते. मात्र, बागायती भागासह लोकवस्ती व मोठमोठ्या गावांमध्ये वन्यप्राण्यांचा धोका जास्त असतो. आत्तापर्यंत अशा अनेक ठिकाणी जनावरांवर हल्ले झाले. त्यात काही ठिकाणी जनावरे दगावली. तसेच, अनेक ठिकाणी मनुष्यावर हल्ले झाले असून, यात काही मनुष्य दगावले आहेत. त्यामुळे सध्यातरी दोन्हीही तालुक्यांतील गावांमध्ये बिबट्यांची दहशत मोठ्या प्रमाणावर पाहवयास मिळते.
गवे नेमके आले तरी कुठून?
त्यातच आता दौंड तालुक्यातील पारगाव सा.मा. आणि शिरूर तालुक्याच्या पूर्व भागातील गणेगाव दुमाला या भागात शेतकरी व नागरिकांना गव्याचे दर्शन झाले. हे गवे मोठमोठे होते. ज्यांनी ते पाहिले त्यांना भीती वाटली. त्यामुळे बिबट्यांच्या पाठोपाठ आता गव्यांची देखील मोठी दहशत निर्माण झाल्याची वस्तुस्थिती पाहावयास मिळत आहेत. मात्र, हे गवे आले कुठून, याची चर्चा सध्या मोठ्या प्रमाणावर सुरू आहे.
वन विभागाने वेळीच लक्ष देणे गरजेचे
एकीकडे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, तर दुसरीकडे कमी होणारे जंगल यामुळे वन्यजीव पाणी, निवारा व चार्याच्या शोधार्थ बागायती भागापर्यंत पोहचतात. बागायती भागात या महत्त्वाच्या तिन्ही गोष्टी बाराही महिने उपलब्ध असल्याने हे वन्यजीव याच भागात वास्तव्य करतात. कालांतराने यांची उत्पत्ती होते आणि मग संख्या मोठी झाल्यावर शेतीपिकांचे नुकसान होणार असल्याचे शेतकर्यांकडून सांगण्यात आले. एखादे मोठे संकट ओढवण्याआधी वन विभागाने या समस्येकडे काळजीपूर्वक लक्ष देणे गरजेचे आहे.