अकरावीच्या 16 लाख 76 हजार जागांसाठी राबविणार प्रवेश प्रक्रिया AI photo
पुणे

11th Admission Process: अकरावीच्या 16 लाख 76 हजार जागांसाठी राबविणार प्रवेश प्रक्रिया

15 ऑगस्टपर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याचे उद्दिष्ट

पुढारी वृत्तसेवा

पुणे: दरवर्षी दिवाळीपर्यंत सुरू राहणारी इयत्ता अकरावीची केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया यंदा 15 ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे माध्यमिक व उच्च माध्यमिक संचालनालयाचे उद्दिष्ट आहे. 11 ऑगस्टपासून कनिष्ठ महाविद्यालयांचे वर्ग सुरू केले जाणार आहेत.

केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी राज्यातील जवळपास 11 हजार 700 कनिष्ठ महाविद्यालयांतील अकरावीच्या सुमारे 16 लाख 76 हजार जागा उपलब्ध होणार असून, या माध्यमातून अकरावीच्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या प्रवेशावर लक्ष राहणार असल्याची माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक संपत सूर्यवंशी यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी शिक्षण सहसंचालक श्रीराम पानझडे उपस्थित होते. (latest pune news)

राज्यात आतापर्यंत पुणे आणि पिंपरी-चिंचवडसह मुंबई, नागपूर, नाशिक आणि अमरावती महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमधील अकरावीच्या प्रवेशासाठी ऑनलाइन प्रक्रिया राबवली जात होती. त्या अंतर्गत सुमारे एक हजार 730 महाविद्यालयांंतील सुमारे सव्वासहा लाख जागांवर साडेचार लाख विद्यार्थी प्रवेश घेत होते. आता संपूर्ण राज्यभरात केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार आहे.

सूर्यवंशी म्हणाले, अकरावीच्या प्रवेशासाठी https://mahafyjcadmissions.in हे स्वतंत्र संकेतस्थळ कार्यान्वित केले आहे. त्याद्वारे विद्यार्थ्यांच्या नोंदणीची प्रक्रिया 19 मेपासून सुरू होणार आहे. केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांना एका अर्जातच राज्यभरातील महाविद्यालयांतील प्रवेशाचा पर्याय उपलब्ध होणार आहे.

ही प्रवेश प्रक्रिया राबविण्यासाठी समन्वय अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. त्यांच्या देखरेखीखाली जिल्ह्यातील प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार आहे. तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनासाठी प्रत्येक महाविद्यालयात मार्गदर्शन केंद्रे सुरू करण्याचे नियोजन आहे.

अनधिकृतरीत्या प्रवेश देणार्‍या संस्थांना चाप

संकेतस्थळावर अकरावीच्या प्रवेशासाठी उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांची नोंदणी सुरू करण्यात आली आहे. त्यात विभागीय शिक्षण उपसंचालक आणि संबंधित शिक्षणाधिकार्‍यांनी प्रमाणित केलेल्या महाविद्यालयांनाच संबंधित संकेतस्थळावर नोंदणी करता येणार आहे.

विद्यार्थ्यांना अकरावीला प्रवेश द्यायचा असल्यास महाविद्यालयांना विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातून मान्यता घ्यावी लागणार आहे. मान्यता नसलेल्या किंवा अनधिकृतरीत्या अकरावी-बारावीला प्रवेश देणार्‍या संस्थांना चाप लागणार असल्याचेही सूर्यवंशी यांनी नमूद केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT