फुरसुंगी : उरुळी देवाची गावातून जुना पालखीमार्गे आदर्शनगरकडे जाणाऱ्या तीव चढावरील मुख्य रस्त्याची मोठी दुरवस्था झाल्याने येथील स्थानिक रहिवाशांची मोठी गैरसोय होत होती. प्रशासनाकडे मागणी करूनही रस्त्याची दुरुस्ती होत नसल्याने उरुळी देवाची गावच्या माजी सरपंचांनी पुढाकार घेऊन स्व-खर्चातून येथील रस्ता दुरुस्ती करत इतरांपुढे एक नवीन आदर्श निर्माण केला आहे.(Latest Pune News)
मंतरवाडी-कात्रज बाह्यवळण मार्गावरील खिंडीतून उरुळी देवाची गावच्या हद्दीत असलेल्या आदर्शनगरकडे जाणाऱ्या या रस्त्याची तीव चढावरच दुरवस्था होऊन हा रस्ता माळरानासारखा झाला होता. याबाबत येथील रहिवाशांनी वारंवार महापालिका व नगर परिषदेकडे दुरुस्तीची मागणी केली होती. दुरुस्तीअभावी या चढ-उतार असणाऱ्या ठिकाणाहून वाहन चालविणे धोकादायक झाले होते. अनेक दुचाकीस्वार दुचाकी घसरून जखमी झाले होते, चारचाकी वाहने खाली दगडांवर आदळून रस्त्यामध्येच बंद पडत होती. पावसाळ्यात तर या ठिकाणाहून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत होता.
गेल्या काही वर्षांपासून उरुळी देवाची व फुरसुंगी या दोन्ही गावांतील रस्ते, पाणी, सांडपाणी, कचरा या समस्या तीव झाल्या आहेत. विकासकामे तर दूरच मात्र कचरा उचलणे, पथदिवे बदलणे, रस्त्यातील खड्डे बुजविणे, यासारखे नागरी प्रश्नही प्रलंबित आहेत. लोकप्रतिनिधी नसल्याने प्रशासन गेंड्याच्या कातडीचे झाले आहे. त्यामुळेच आदर्शनगरमधील रहिवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेऊनच स्व-खर्चाने येथील रस्त्याचे काम करून दिल्याचे माजी सरपंच उल्हास शेवाळे यांनी सांगितले.
आदर्शनगरमधील रस्त्याची स्व-खर्चाने दुरुस्ती करून घेताना उल्हास शेवाळे.