पुणे

‘एमसीए’त सचिवांची हुकूमशाही : कमल सावंत; अ‍ॅपेक्स कमिटीचा राजीनामा

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा

'एमसीए'मध्ये खेळाडूंची नाही, तर सचिवांचीच जास्त हुकूमशाही चालते. त्यामुळे याविरोधात मी अ‍ॅपेक्स कमिटीचा राजीनामा देत आहे,' अशी माहिती महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अ‍ॅपेक्स कमिटीच्या सदस्या आणि माजी महिला क्रिकेटपटू अ‍ॅड. कमल सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनमधील भ्रष्टाचार आणि बेकायदा निवडणुकीविरोधात माजी रणजी खेळाडू अनिल वाल्हेकर यांनी उपोषणाला सुरुवात केली आहे. या उपोषणस्थळी आयोजित पत्रकार परिषदेत अ‍ॅड. सावंत बोलत होत्या. या वेळी माजी भारतीय महिला खेळाडू नीता कदम यांच्यासह माजी क्रिकेटपटू उपस्थित होते.

विविध व्यवहारांमध्ये भ्रष्टाचार

अ‍ॅड. सावंत म्हणाल्या, 'महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनमध्ये (एमसीए) खेळाडूंच्या निवडीपासून ते विविध व्यवहारांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचे समोर येत आहे. 'एमसीए'मध्ये सचिवांमुळे संघटना रसातळाला गेली असून, खेळाडूंचे मोठे नुकसान होत आहे. महिला संघातील मुलींची निवास आणि भोजनाची व्यवस्था निकृष्ट दर्जाची असून, त्यांना अवघा 90 रुपये रोज आणि प्रवास भत्ता दिला जातो. या भत्त्यात वाढ करावी, अशी मागणी केली असता निधी नसल्याचे सांगितले जाते. एका निवड समिती सदस्याच्या मनमानीला बळी पडून पाच सामने जिंकलेल्या कर्णधाराला अचानक बदलण्यात आले. याबाबत महिला कमिटी किंवा सदस्यांनाही कल्पना देण्याचे कष्ट सचिवांनी घेतले नाहीत.'

'एमसीए सचिव एककल्लीपणे निर्णय घेतात आणि ते निवड समिती, प्रशिक्षक आणि सदस्यांच्या माथी मारून मनमानी करतात. गेली दोन वर्षे याबाबत सातत्याने 'एमसीए' बैठकीत म्हणणे मांडूनही सचिव जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून संघटनेचे नुकसान करीत आहेत. या सर्व प्रकारांमुळेच मी राजीनामा दिला,' असे अ‍ॅड. सावंत यांनी सांगितले. या संदर्भात महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे सचिव रियाझ बागवान यांच्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही.

सचिवांमुळे रखडली 'एमपीएल' स्पर्धा

महाराष्ट्रातील मुलींना अधिकाधिक स्पर्धा मिळाव्यात, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मुलींसाठी स्वतंत्र महाराष्ट्र प्रीमियर लीग (एमपीएल) स्पर्धा घ्यावी, असा प्रस्ताव दिला होता. त्यासाठी 1 कोटी रुपयांचे बाहेरून बजेट येणार होते. त्यामध्ये एमसीएला 12 लाख, प्रथम, द्वितीय आणि तृतीय विजेत्यांना प्रत्येकी 50 हजार, 30 हजार आणि 20 हजार रुपये खेळाडूंना मिळणार होते; परंतु या स्पर्धेचा विचारही सचिवांनी केला नसल्याचे अ‍ॅड. सावंत यांनी सांगितले.

'एमसीए'च्या विरोधात गेल्या अकरा दिवसांपासून आमरण उपोषणाला बसलो आहे. मी 'एमसीए'चा सदस्य नसल्याचे सचिव सांगत आहेत. मात्र, एमसीए घटनेच्या निवडणूक नियमानुसार माझा सभासद क्रमांक एमएचसीए 0559 हा आहे. 'एमसीए'च्या भ्रष्टाचाराविरोधात पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असून, दोन दिवसांत संबंधितांवर गुन्हाही दाखल होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर 'एमसीए'वर त्वरित प्रशासक नेमावा, अशी मागणी माझ्यासह सर्व माजी खेळाडू करणार आहेत.

                                                                                               – अनिल वाल्हेकर, आंदोलनकर्ते आणि माजी रणजी खेळाडू

SCROLL FOR NEXT