पुणे: औंधमधील परिहार चौकातील गाळे वाटपातील गैरव्यवहार तसेच दोन हजार चौरस फुटांपेक्षा जास्त क्षेत्रफळाच्या मिळकतीचे कर मूल्यांकन करण्याचे अधिकार नसतानाही त्याचे उल्लंघन करणे, करवसुली प्रकरणात संदिग्धता ठेवणे महापालिकेचे उपायुक्त माधव जगताप यांना चांगलेच भोवले आहे.
या प्रकरणी जगताप हे दोषी आढळल्याने त्यांच्यावर आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी कारवाई करत त्यांच्या दोन पगारवाढ थांबवल्या आहेत. या सोबतच त्यांच्या सेवा पुस्तकावर देखील या प्रकरणी शेरा देण्यात आला आहे. तसेच, या पुढे त्यांना मिळकत कर विभागाची जबाबदारी दिली जणार नाही, असे देखील स्पष्ट केले आहे.
औंधमधील परिहार चौकातील गाळा वाटप प्रकरणी घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. येथील शिवदत्त मिनी मार्केटमध्ये बेकायदेशीरपणे 30 व्यावसायिकांचे पुनर्वसन करताना जगताप यांनी त्यांच्या कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन या गाळ्यांचे वाटप करत वरिष्ठांची दिशाभूल केल्याचे उघड झाले होते.
दरम्यान, या प्रकरणाच्या तक्रारी आल्याने त्यांची चौकशी करण्याची मागणी केली जात होती. याच दरम्यान जगताप यांची मिळकत कर विभागाच्या उपायुक्तपदी बदली झाली. मिळकतकर वसूल करताना सिंहगड संस्थेसंदर्भातील माहिती त्यांनी लपवल्याने मनसेचे पुणे शहर सरचिटणीस हेमंत संभूस यांनी या प्रकरणी आयुक्तांकडे तक्रार करत कारवाईची मागणी केली होती.
त्यानुसार पालिका आयुक्तांनी या प्रकरणी चौकशी समिती नेमली होती. या चौकशीत माधव जगताप हे दोषी आढळले असून त्यानुसार पालिका आयुक्तांनी ही कारवाई केली असल्याची माहिती हेमंत संबूस यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
संबूस म्हणाले, आम्ही सतत या प्रकरणाचा पाठपुरावा करत होतो. त्यानुसार पालिका आयुक्तांनी ही कारवाई केली. या कारवाईचे पत्र देखील त्यांनी आम्हाला दिले आहे. जगताप यांना पुन्हा मिळकत कर विभाग दिला जाणार नाही, असे आश्वासन देखील आयुक्तांनी दिले आहे. जगताप यांच्या कार्यकाळात ज्या मिळकतीचे मूल्यांकन झाले आहे, त्याची चौकशी ही होणे आवश्यक आहे, अशी मागणी केली आहे.
...तर चंद्रकांत पाटील यांच्या घरावर मोर्चा काढू
पुण्यातील शिक्षणसंस्थांच्या मिळकत कर थकबाकीदारांबाबत आम्ही चंद्रकांत पाटील यांना निवेदन दिले होते. मात्र, त्यांनी या प्रकरणी कोणतीही दखल घेतली नाही. सिंहगड कॉलेजने मिळकत कर थकवल्या प्रकरणी कारवाई झाली नाही तर आम्ही थेट चंद्रकांत पाटील यांच्या घरावर मोर्चा काढू व मनसे स्टाइल उत्तर देऊ, असे हेमंत संभूस यांनी सांगितले.
माधव जगताप यांच्याविरोधात अनेक तक्रारी आल्या होत्या. त्यांनी मिळकतीचे मूल्यांकन करताना अधिकाराचे उल्लंघन केले असल्याचे आढळले असून त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करत त्यांच्या दोन वेतनवाढ रोखण्यात आल्या आहेत.- पृथ्वीराज बी. पी., अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका