Water Issue: अजून किती वर्षे पाण्याची वाट पाहायची? मांजरी बुद्रुक येथील नागरिकांचा सवाल

पाणी योजना होऊनही प्रश्न सुटेना
Pune News
अजून किती वर्षे पाण्याची वाट पाहायची? मांजरी बुद्रुक येथील नागरिकांचा सवालPudhari
Published on
Updated on

प्रमोद गिरी

मांजरी: सात वर्षांपूर्वी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची 43 कोटी रुपयांची पाणी योजना मंजूर करून काम सुरू करण्यात आले. त्यानंतर गेल्या पाच वर्षांपूर्वी चोवीस तास पाणीपुरवठ्याचे स्वप्नही दाखविण्यात आले. मात्र, अजूनही मांजरी बुद्रुक परिसरातील सुमारे सव्वा लाख नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही. तसेच पाणी योजनेचे काही काम अद्यापही अपूर्ण आहे. यामुळे पाण्याची अजून किती वर्षे वाट पाहायची? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने मांजरी परिसरात ठिकठिकाणी पाण्याच्या टाक्या उभारल्या आहेत. मात्र सध्या ‘टाक्या उशाला अन् कोरड घशाला,’ अशी अवस्था येथील नागरिकांची झाली आहे. या योजनेंतर्गत मुख्य रस्ता, तसेच अंतर्गत गल्ल्यांमध्ये जलवाहिन्या टाकण्यात आल्या.

त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झालेले असून, ठिकठिकाणी जोडकाम सदोष झाले आहे. तर काही ठिकाणी जलवाहिन्यांमध्ये कचरा साचला आहे. प्रत्यक्ष काम सुरू असताना प्रशासनाचे यावर कुठल्याही प्रकारचे नियंत्रण नव्हते. यामुळे हे काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचे नागरिकांनी सांगितले.

रहिवाशी गणेश घुले म्हणाले की, विधानसभा निवडणुकीपूर्वी ठिकठिकाणी कुठलीही नियमावली निश्चित न करता ठेकेदाराने नागरिकांकडून अप्रत्यक्षपणे प्रत्येक कनेक्शनसाठी पंधराशे ते सोळाशे रुपये घेऊन नळजोड दिले आहेत.

रहिवाशी छाया बनसोडे म्हणाल्या की, मांजरी रेल्वे गेट आणि मुंढवा रोड परिसरातील नागरिकांना अद्यापही या योजनेचे पाणी मिळत नाही. प्रशासनाने तातडीने या भागात पाणी उपलब्ध करून द्यावे. दीपिका पतींगे यांनी सांगितले की, मोरे वस्ती परिसरात दिवसाआड केवळ अर्धा तास पाणी सोडले जाते. परिसरात नियमित व पुरेसा पाणीपुरवठा होणे गरजेचे आहे.

सर्वसामान्य नागरिकांना अर्धा इंची व इतरांना मात्र पाऊन ते एक इंचाच्या जोडण्या देण्यात आल्या आहेत. यात मोठा दुजाभाव करण्यात आला आहे. परिसरातील पाणीपुरवठ्याबाबत लेखी आश्वासन न मिळाल्यास मांजरी ग्रामस्थांसह शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या वतीने तीव्र जनआंदोलन करण्याचा इशारा प्रवीण रणदिवे यांनी दिला आहे. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री, महापालिका आयुक्त, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता आणि लष्कर पाणीपुरवठा विभागाला निवेदन दिले आहे.

काही ठिकाणी पाणी सोडण्यातही भेदभाव करण्यात येत आहे. नागरिकांना आठवड्यातून एक ते दोन वेळेस पाणीपुरवठा केला जात आहे. समान पद्धतीने पाणीपुरवठा होत नाही याला जबाबदार कोण, याचे स्पष्टीकरण प्रशासनाने द्यावे.

-दीपक राखपसरे, रहिवासी, मांजरी बुद्रुक

मांजरी बुद्रुक येथील पाणी प्रश्नासंदर्भात पुढील आठवड्यात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि महापालिका यांची संयुक्त बैठक होणार आहे. निधी आणि सुधारित आराखडा तातडीने मंजूर करून जूनअखेरपर्यंत येथील पाणी प्रश्न मार्गी लावण्यात येणार आहे.

- महादेव देवकर, अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news