बाजीराव गायकवाड
धनकवडी: आंबेगाव पठार परिसरातील नागरिकांना सध्या पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. बहुतांश सोसायट्यांना महापालिकेकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र, हे पाणी पुरेशे नसल्याने गेल्या दोन आठवड्यांपासून नागरिकांची पाण्यासाठी वणवण सुरू आहे. ही समस्या सोडविण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. (Water shortage in Pune latest news 2025)
धनकवडीलगतच्या आंबेगाव पठार परिसरातील सर्व्हे नंबर 15 आणि 16, आंबेगाव बुद्रुक, दत्तनगर, सिंहगड कॉलेज रस्ता परिसर, शिवसृष्टी परिसरातील भिंताडेनगर आदी भागातील नागरिकांना पुरेशे पाणी मिळत नाही. याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे रहिवाशांनी सांगितले. नव्याने विकसित होत असलेल्या या भागात मोठ्या प्रमाणावर नवीन बांधकामे उभी राहिली आहेत. नागरिकरण झपाट्याने वाढत आहे.
त्यामुळे परिसरातील पाणी समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. भिंताडेनगरमधील आठ ते दहा सोसायट्यांसह चंद्रांगण व कपिल सोसायट्यांना पद्मावती पंपिंग स्टेशनमधून टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. शिवसृष्टी, सिंहगड कॉलेज, ज्ञानपीठलगतच्या चिंतामणी रहिवासी सोसायटीत देखील पाण्याची समस्या निर्माण झाली आहे.
आंबेगाव पठार परिसरात काही ठिकाणी दिवसाआड आणि कमी प्रमाणात टँकरने पाणीपुरवठा केला जात असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. महापालिका प्रशासनाने या भागात टँकरच्या खेपा वाढविण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. पद्मावती पाणीपुरवठा केंद्रातून या परिसरासाठी सुमारे 90 ते 100 टँकरच्या खेपा होत आहेत.
मात्र लोकसंख्येच्या तुलनेत त्या अपुर्या असल्याचे नागरिकांनी सांगितले. सामाजिक कार्यकर्ते सुनील पवार म्हणाले की, परिसरातील नागरिक महापालिकेला लाखो रुपयांचा कर देत आहेत, तरीही त्यांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. पाण्यासाठी टँकरवर अवलंबून रहावे लागत आहे. प्रशासनाने पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविणे आवश्यक आहे.
अजून किती दिवस वाट पाहायची?
आंबेगाव पठार परिसरातील सर्व्हे नंबर 15 आणि 16 मध्ये जलवाहिन्याटाकण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर पाण्याचा प्रश्न सुटण्याची अपेक्षा नागरिकांना होती. मात्र अद्यापही जलवाहिन्यांतून पाणीपुरवठा करण्यात येत नाही. त्यामुळे अजून किती दिवस पाण्याची प्रतीक्षा करायची, असा सवाल रहिवाशांनी उपस्थित केला आहे.
नागरिकांकडून आंदोलनाचा इशारा
आंबेगाव पठार परिसरातील अंतर्गत जलवाहिन्यांचे काम झालेले आहे. मात्र या वाहिन्यांच्या माध्यमातून अद्यापही महापालिकेने पाणीपुरवठा सुरू केला नाही. गेली दोन -अडीच वर्षांपासून यासाठी महापालिकेकडे पाठपुरावा केला जात आहे. प्रसंगी आंदोलनही करण्यात आले आहे. महापालिका आयुक्तांनी लवकरात लवकर पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अद्यापीही ही समस्या सुटली नाही. जलवाहिन्यांतून लवकरात लवकर पाणीपुरवठा केला नाही, तर नागरिकांच्या वतीने पुन्हा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा माजी नगरसेवक बाळाभाऊ धनकवडे यांनी दिला आहे.
आंबेगाव पठार परिसरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी संबंधित अधिकार्यांना सूचना करण्यात येतील. पाणीपुरवठ्याची समस्या लवकरात लवकर सोडवून नागरिकांची गैरसोय दूर केली जाईल.
-तिमैया जगले, प्रभारी सहायक आयुक्त, धनकवडी- सहकारनगर क्षेत्रीय कार्यालय