पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक वजनकाटे बसवावेत, अशा सूचना यापूर्वीच दिल्या आहेत. तसेच, अशा वजनकाट्यांबाबत शेतकर्यांच्या तक्रारी आल्यास संबंधित बाजार समित्यांवर कायदा व नियमातील तरतुदीनुसार योग्य कारवाई करण्याच्या परिपत्रकीय सूचना पणन संचालक विकास रसाळ यांनी सर्व जिल्हा उपनिबंधकांना दिल्या आहेत. शेतकर्यांच्या शेतमाल वजनाबाबत कोणत्याही तक्रारी येणार नाहीत यासाठी दक्षता घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.
महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी-विक्री (विकास व विनियमन) नियम 1967 नुसार बाजार समितीने शेतमाल वजनमाप करण्यासाठी वजनकाटे बसविले पाहिजेत आणि ते योग्य त्या चालू स्थितीत ठेवले पाहिजेत.
खरेदीदार, विक्रेतेदारास बाजार समितीने ठरविलेले शुल्क देऊन आपल्या शेतमालाचे वजनमाप करता येईल. अचूक शेतमाल वजनमापासाठी पणन संचालनालय, शासन, शेतकरी आणि शेतकरी संघटना आग्रही आहेत. शासनाने पर्यायी बाजार व्यवस्थेबाबत नेमलेल्या अभ्यास गटाच्या अहवालातही शेतमालाचे वजनमाप चोख असण्याचा मुद्दा मांडला होता. त्या पार्श्वभूमीवर पणनचे 15 मार्चचे परिपत्रक महत्त्वपूर्ण ठरणार आहे. बाजार समित्यांमध्ये काही वेळा तीन-चार शेतकर्यांचा एकत्रित शेतमाल एका वाहनातून आणला जातो आणि अशा वेळेस अधिकृत वजनकाट्यावर वजन न करता व्यापार्यांकडे असलेल्या छोट्या वजनकाट्यावर वजन करण्यास सांगण्यात येते. बाहेरील किंवा व्यापार्यांच्या वजनकाट्यावर वजन केल्यामुळे शेतमालाच्या वजनात तफावत आढळल्याने शेतकर्यांचे आर्थिक नुकसान होत असल्याच्या तक्रारी पणन संचालनालयास प्राप्त होत आहेत. शिवाय वजन तफावतीमुळे बाजार समितीची बाजार फी व शासनाचे देखभाल फीचेही नुकसान होते.
मुंबई येथील महाराष्ट्र स्टेट को-ऑप. कन्झ्युमर्स फेडरेशनला इलेक्ट्रॉनिक वजनकाटा बसविण्यासाठी दोन हजार चौरस फूट जागा सुमारे 30 वर्षे कालावधीसाठी भाडेकरारावर बांधा-वापरा या तत्त्वावर काही बाजार समित्यांनी उपलब्ध करून दिली आहे. त्यांनी बसविलेल्या वजनकाट्यावर केलेल्या शेतमाल वजनामुळे शेतकरी व अन्य घटकांची सोय होऊन वजनमापाबाबतच्या तक्रारी कमी झाल्या आहेत.
हेही वाचा