पुणे

.. त्या 25 अनधिकृत होर्डिंगवर कारवाई

Laxman Dhenge

सासवड : पुढारी वृत्तसेवा : मुंबईतील होर्डिंग दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर सासवड नगरपरिषदेच्या वतीने हद्दीतील 15 मोठे आणि लहान 10 अनधिकृत होर्डिंग तसेच त्याच पद्धतीचे फ्लेक्स, विजेच्या खांबांवरील अनेक छोट्या जाहिरातींंच्या फ्लेक्सवर कारवाई करण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण यांनी दिली.

मुंबईतील होर्डिंग दुर्घटनेत तब्बल 17 जणांचा मृत्यू, तर 70 पेक्षा जास्त नागरिक जखमी झाले होते. या घटनेनंतर राज्य शासनाने सर्व अनधिकृत होर्डिंग जमीनदोस्त करण्याचे, तर अधिकृत होर्डिंग मालकांना स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश दिले. त्यामुळे संपूर्ण राज्यातील अनधिकृत होर्डिंग जमीनदोस्त करण्याचा सपाटा सुरू आहे. पुरंदर तालुक्यातील सासवडमधील तब्बल 25 अनधिकृत होर्डिंग नगरपालिकेने जेसीबी लावून उद्ध्वस्त केले. दरम्यान, पुणे जिल्हा परिषदेने तत्काळ पत्र काढून जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील होर्डिंगवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. पुरंदर ग्रामीण भागातील दिवे, भिवरी, बोपगाव, चांबळी, वाघापूर चौफुला, परिंचे, वीर, भिवडी, नारायणपूर आदी गावांत राजकीय नेत्यांच्या कार्यकर्त्यांकडून मोठमोठे अनधिकृत होर्डिंग उभारले असल्याचे समोर आले आहे. हे सर्व होर्डिंग सरकारी गायरान, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच ग्रामपंचायतीच्या जागेत उभारले आहेत.

पं. स.कडून केवळ नोटिसा

एकाही होर्डिंगमालकाने संबंधित विभागाची परवानगी घेतलेली नाही. असे असताना पुरंदर पंचायत समितीने सर्व होर्डिंग जमीनदोस्त करण्याऐवजी ग्रामपंचायतीमार्फत नोटीस पाठवून स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत. मुळातच एकही
होर्डिंग अधिकृत नसताना त्याचे स्ट्रक्चरल ऑडिट कसे करणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. याबाबत पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी डॉ. अमिता पवार यांच्याशी ग्रामीण भागातील होर्डिंगवर कारवाईसंदर्भात संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT