आरोपी राजेंद्र हगवणेचा पवनानगरमध्ये मुक्काम; मावळ कनेक्शन ठरतेय चर्चेचा विषय  Pudhari
पुणे

Rajendra Hagawane: आरोपी राजेंद्र हगवणेचा पवनानगरमध्ये मुक्काम; मावळ कनेक्शन ठरतेय चर्चेचा विषय

हॉटेलमध्ये या बाप-लेकांनी मटण बिर्याणी, सुक्का मटण, भाकरीवर ताव मारला.

पुढारी वृत्तसेवा

वडगाव मावळ: वैष्णवी हगवणे हत्या प्रकरणातील आरोपी राजेंद्र हगवणे व त्याचा मुलगा हे वैष्णवीच्या मृत्यूनंतर दुसर्‍याच दिवशी मावळ तालुक्यात एका हॉटेलमध्ये मटणावर ताव मारून पवना धरणाच्या परिसरातील एका फार्म हाऊसवर मुक्कामी राहिल्याने या हगवणे प्रकरणाशी मावळ कनेक्शन चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे.

16 मे रोजी वैष्णवीने आत्महत्या केली. दुसर्‍या दिवशी 17 मे रोजी सकाळी रुग्णालयात गेले असता अटकेच्या भीतीने राजेंद्र हगवणे व त्याचा मुलगा सुशील हगवणे यांनी तिथून धूम ठोकली आणि थेट 23 मे रोजी म्हणजे सात दिवसांनी पोलिसांनी स्वारगेट परिसरात त्या दोघांच्या मुसक्या आवळल्या.  (Latest Pune News)

या सात दिवसांच्या काळात त्यांनी बावधन, वडगाव मावळ, पवनानगर, आळंदी, वडगाव मावळ, पवनानगर, पुसेगाव, कोगनळी व पुणे असा प्रवास केल्याची माहिती पोलिसांना मिळाली.या सात दिवसांच्या प्रवासात हगवणे बाप-लेकांचे मावळ कनेक्शन चांगलेच चर्चेत आले आहे.

दि. 17 रोजी औंध येथून फरार झाल्यावर ते बावधन येथे मुहूर्त लॉन्स येथे गेले. तेथून वडगाव मावळ येथील एका हॉटेलवर आले. त्या हॉटेलमध्ये या बाप-लेकांनी मटण बिर्याणी, सुक्का मटण, भाकरी असे जेवण केले.

सुनेचा अंत्यविधी होण्यापूर्वीच या बाप-लेकांनी मटणावर ताव मारला. त्यानंतर ते मावळ तालुक्यातील पवना धरण परिसरात गेले. परंतु, पोलिसांची चाहूल लागताच त्यांनी थेट आळंदी गाठले.18 मे रोजी पुन्हा वडगाव मावळवरून पवना धरण परिसरातील वारू-ठाकूरसाई जवळ एका फार्म हाऊसवर गेले आणि तिथे त्यांनी मुक्काम केल्याची माहिती पोलिस तपासात पुढे आली.

तेथून त्यांनी पलायन केले आणि सातारा जिल्ह्यातील पुसेगाव येथे ते गेले. दरम्यान, वडगाव मावळ येथे हॉटेलमध्ये मटणावर मारलेला ताव आणि पवना धरण परिसरात फॉर्म हाऊसवर केलेला मुक्काम, या दोन गोष्टी हगवणे बाप-लेकांच्या मावळ कनेक्शनच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठरल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT