पुणे

रक्ताच्या दोन डागांनी आरोपी गजाआड; चालत्या गाडीत गोळी झाडून खून

अमृता चौगुले

अशोक मोराळे

पुणे : चालत्या वाहनात गोळी झाडून खून केल्यानंतर आरोपी मोकाट फिरत होते. मात्र, चाणाक्ष पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान करीत वाहनातील रक्ताच्या दोन डागांवरून त्यांना अखेर गजाआड करण्यात यश मिळविले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वारजे परिसरात राहणारा गजानन हवा (वय 38) हा देवीची पूजाअर्चा करून उदरनिर्वाह करीत होता. सौरभ आमले (वय 22, रा. कर्वेनगर, मावळेआळी), गणेश वांजळे (वय 39, रा. देशमुखवाडी, शिवणे), सोमेश चव्हाण (रा. गोसावीवस्ती, कर्वेनगर) हे तिघे त्याला जमिनीचा व्यवहार होत नसल्यामुळे विधी करण्यासाठी एका चारचाकी गाडीतून 18 मे रोजी सायंकाळी साडेपाच वाजता मुळशीच्या दिशेने घेऊन गेले. ती गाडी त्यांनी कोथरूड येथील एका गॅरेजवरून भाड्याने घेतली होती. काही वेळातच गाडी थेट ताम्हिणी घाटाच्या दिशने वेगात धावू लागली.

गजानन त्यांना विचारत होता, 'आपण कोठे चाललो आहोत?' मात्र, आरोपींनी रस्ता चुकल्याचे सांगत गाडी घाटातून खाली उतरवली. एका पंपावर गाडीत डिझेल भरून परत पुण्याच्या दिशेने निघाले. चालत्या गाडीतच चव्हाणने पिस्तुलातून गोळी झाडून गजाननला ठार मारले. वांजळे हा त्याचा चेला आहे. अचानक झालेल्या प्रकारामुळे तो घाबरून गेला. त्यालादेखील दोघांनी आपल्यात सहभागी करून घेतले. नांदेवली गावच्या जंगल परिसरातील एका खड्ड्यात त्यास पुरून टाकण्यात आले. तेथून आरोपी पुण्यात आले. आपल्या कृत्याचा पोलिसांना सुगावा लागू नये म्हणून तिघांनी पूर्ण काळजी घेतली. वांजळे याच्या शर्टावर गजाननच्या रक्ताचे डाग पडले होते. चव्हाणने वांजळेच्या अंगावरील कपडे काढून घेतले. त्यानंतर मेडिकलमधून निर्जंतुकीकरणाचे औषध घेऊन गाडी साफ करून गॅरेजमालकाच्या ताब्यात दिली. इकडे रात्रभर गजानन घरी न आल्यामुळे शोधा-शोध सुरू झाली होती.

त्यानंतर बहिणीने पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. पोलिसांना चौकशीदरम्यान काहीतरी काळेबेरे झाल्याची चाहूल लागली. त्यानुसार त्यांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. एका सीसीटीव्ही कॅमेर्‍यात आरोपींची गाडी दिसली. त्यांनी गाडीमालकाला शोधून गाडी ताब्यात घेतली. गाडीमध्ये रक्ताचे डाग आढळले. त्यानंतर गाडी भाड्याने घेणार्‍या व्यक्तीकडून चव्हाणची माहिती मिळवली. तांत्रिक विश्लेषणावरून त्याच्या मोबाईलचा सीडीआर पोलिसांनी काढला. त्या वेळी सौरभ आमले याच्याशी संपर्क झाल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार सौरभला राहत्या घरातून ताब्यात घेतले. गणेश व सौरभ यांच्या चौकशीत गजाननसोबत काय केले, याची माहिती मिळाली. पोलिसांना आता त्याचा खून झाल्याची खात्री झाली होती.

सौरभला गाडीत बसवून वरिष्ठ पोलिस निरीक्षक शंकर खटके, पोलिस उपनिरीक्षक नरेंद्र मुंढे, स्नेहल जाधव, अमोल सावंत, कर्मचारी गोविंद फड, बाळू शिरसाट, अमोल काटकर, अमोल राऊत यांच्या पथकाने थेट नांदेवली गावचे जंगल गाठले. तेथील एका खड्ड्यात गजाननचा मृतदेह मिळून आला. शवविच्छेदन अहवालात गोळी झाडून खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी आतापर्यंत सौरभ आमले व गणेश वांजळे या दोघांना अटक केली आहे, तर सोमेश चव्हाण हा अद्याप फरार आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, तोच गजाननच्या खुनाचा मुख्य सूत्रधार आहे. गजाननच्या अंगावरील सोन्याच्या कारणातून त्याचा खून केल्याचा पोलिसांचा प्राथमिक
अंदाज आहे. मात्र, पोलिस इतर सर्व बाजूने तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT