पुणे

पुणे : समाविष्ट गावांच्या विकासाचा गाडा अद्यापही रुतलेलाच!

अमृता चौगुले

हिरा सरवदे

पुणे : महापालिका हद्दीत समावेश झाल्यानंतर गावांचा विकासाचा गाडा पुढे जाईल, अशी भाबडी आशा बाळगलेल्या नागरिकांची निराशा झाली आहे. या गावांमधून जमा होणार्‍या कराच्या तुलनेत विकासासाठी मात्र तोकड्या निधीची तरतूद केली जाते. परिणामी, मागील पाच वर्षांत समाविष्ट गावांच्या विकासाचा गाडा रुतलेला दिसत आहे.

महापालिका हद्दीत 1998 ला 23 गावे, डिसेंबर 2012 मध्ये येवलेवाडी, ऑक्टोबर 2017 मध्ये लोहगाव, साडेसतरानळी, केशवनगर, फुरसुंगी, उरुळी देवाची, पिसोळी, आंबेगाव बु., आंबेगाव खु., धायरी, उत्तमनगर, शिवणे ही 11 गावे आणि जून 2021 मध्ये औताडे-हांडेवाडी, होळकरवाडी, शेवाळेवाडी, मांजरी बु., कोंढवे-धावडे, कोपरे, गुजर निंबाळकरवाडी, पिसोळी, वडाचीवाडी, वाघोली, जांभुळवाडी, केळेवाडी, मांगडेवाडी, भिलारवाडी, नांदेड, किरकीटवाडी, खडकवासला, नांदेशी, सणसनगर, नर्‍हे, म्हाळुंगे, सूस, बावधन बु. या 23 गावांचा समावेश झाला.

अंदाजपत्रकात पुरेशी तरतूदच होत नाही

महापालिका हद्दीत गावांचा समावेश झाल्यानंतर रस्त्याचे जाळे, पदपथ, आरोग्य सुविधा, पुरेसा पाणीपुरवठा व प्रकाशव्यवस्था, घनकचर्‍याचे योग्य व्यवस्थापन, स्वच्छतागृहांची सुविधा, मैलापाण्याचे योग्य नियोजन, ओढे व नाल्यांची स्वच्छता आदी कामे महापालिका प्रशासनाने हाती घेणे अपेक्षित होते. त्याचबरोबर मूळ हद्दीतील नागरिकांना मिळणार्‍या विविध सेवासुविधा टप्प्याटप्प्याने गावांमधील नागरिकांनाही मिळतील, अशी आशा येथील नागरिक बाळगून होते. त्यावरच गावांमधील नागरिक महापालिकेचा कर भरू लागले. महापालिकेलाही चांगला महसूल मिळू लागला. मात्र, गावांमधील नागरिक जेवढा कर महापालिकेला देतात, त्यातुलनेत गावांमध्ये विकासकामे झालेली नाहीत. गावांमध्ये मूलभूत सेवासुविधा देण्यासाठी जेवढा निधी आवश्यक आहे, तेवढ्या निधीची तरतूद महापालिकेच्या अंदाजपत्रकामध्ये केली जात नाही. परिणामी, महापालिकेपेक्षा ग्रामपंचायतच बरी म्हणण्याची वेळ गावांमधील नागरिकांवर आली आहे. महापालिका हद्दीत समावेश झालेल्या गावांमध्ये अद्याप पाणीपुरवठा, रस्ते, पदपथ, पथदिवे आणि कचरा या मूलभूत सेवासुविधासुद्धा योग्यप्रकारे मिळालेल्या नाहीत.

महापालिका हद्दीत जून 2017 मध्ये समाविष्ट झालेली 11 गावे जवळपास अडीच वर्षे नगरसेवकांविनाच होती. त्यानंतर सर्व 11 गावांसाठी दोन नगरसेवक मिळाले. मात्र, या दोन्ही नगरसेवकांनी आपले संपूर्ण लक्ष फुरसुंगी, उरुळी देवाची आणि धायरी या तीन गावांवरच केंद्रित केले. त्यामुळे उर्वरित गावांना कोणी वाली आहे की नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. समाविष्ट 11 गावांच्या विकासाचा गाडा जागेवर असताना महापालिका हद्दीत पुन्हा जून 2021 मध्ये 23 गावांचा समावेश करण्यात आला आहे. या गावांना अद्याप वाली मिळालेला नाही. महापालिकेच्या आगामी निवडणुकीनंतर मात्र समाविष्ट झालेल्या 11 आणि 23 अशा 34 गावांना हक्काचे नगरसेवक लाभणार आहेत. ते लाभल्यानंतरच गावांच्या विकासाचा गाडा मार्गस्थ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

शासनाकडून मदत मिळालीच नाही

राज्यात भाजप आणि शिवसेनेची सत्ता असताना 2017 मध्ये शासनाने 11 गावांचा महापालिकेत समावेश केला. मात्र, शासनाने गावांच्या विकासासाठी महापालिकेला फुटकी कवडीही दिली नाही. त्या वेळी राज्यात आणि महापालिकेतही विरोेधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून शासनाने गावांच्या विकासासाठी निधी दिला नाही, म्हणून वारंवार भाजपला लक्ष्य केले जात होते. मात्र, भाजपने याकडे डोळेझाक केली. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारने 2021 मध्ये 23 गावांचा समावेश केला. मात्र, गावांच्या विकासासाठी निधी दिली नाही. शासनाने गावांचा समावेश केला. मात्र, निधी दिला नाही, असा आरोप करीत महापालिकेतील सत्ताधार्‍यांनी पूर्वी त्यांच्यावर झालेल्या आरोपाचे उट्टे काढण्याचा प्रयत्न केला. सत्ताधारी आणि विरोधक यांच्या आरोप-प्रत्यारोपात गावे मात्र निधी आणि विकासापासून वंचित राहिली.

मलवाहिन्यांची कामे संथगतीने

समाविष्ट झालेल्या 11 गावांमध्ये मैलापाण्याची व्यवस्था करण्यासाठी मलवाहिन्या विकसित करणे व मैलापाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी मास्टर प्लॅन तयार करण्यात आला आहे. या मलवाहिन्यांच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले आहे. त्यानंतर मात्र या कामाला अद्याप वेग आलेला नाही, तर समाविष्ट 23 गावांमधील मैलापाण्याचे नियोजन करण्यात येत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT