बारामती: अल्पवयीन मेहुणीवर अत्याचार करणार्यास बारामती येथील तदर्थ जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. सस्ते यांनी आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली. न्यायालयाने आरोपीला 30 हजार रुपये दंड केला असून दंडातील निम्मी रक्कम पीडितेला नुकसानभरपाई म्हणून देण्याचा आदेश दिला.
संबंधित आरोपीच्या पत्नीची लहान बहीण आई-वडील नसल्याने लहानपणापासूनच बालगृहात राहात होती. शिक्षणाच्या निमित्ताने आरोपी तिला गावी घेऊन आला. 5 मे 2019 रोजी पत्नी घरात नसताना पीडितेला धमकावत तिच्यावर शारीरिक अत्याचार केले. घडलेला प्रकार कोणाला सांगितला तर जिवे मारीन अशी धमकी दिली. (Latest Pune News)
हा प्रकार पीडितीने दुसर्या दिवशी आरोपीची आई व त्यानंतर तिच्या आजीला सांगितला. पीडितेच्या बहिणीलाही हा प्रकार समजला. त्यामुळे तिचे पतीशी भांडण झाले. भांडणामुळे तिने विषारी औषध प्राशन केले, त्यात तिचा मृत्यू झाला.
याप्रकरणी बारामती तालुका पोलिस ठाण्यात आरोपीविरोधात पोक्सोसह अन्य कलमान्वये गुन्हा दाखल झाला होता. तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक बी. बी. जाधव यांनी या गुन्ह्याचा तपास करत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
या खटल्यात सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील संदीप ओहोळ यांनी काम पाहिले. त्यांनी सात साक्षीदार तपासले. पीडितेने झालेली घटना न्यायालयात सविस्तर सांगितली. पीडितेचा जबाब व वैद्यकीय पुरावा ग्राह्य धरून न्यायाधीश सस्ते यांनी आरोपीला आजन्म कारावास व तीस हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. या खटल्यात सरकार पक्षाला सहाय्यक फौजदार ए. जे. कवडे, कोर्ट पैरवी अधिकारी नामदेव नलवडे, हवालदार एम. के. शिवरकर यांनी सहकार्य केले.