पुणे; पुढारी वृत्तसेवा : इन्शुरन्सच्या वादातून नामांकित फायनान्स कंपनीचा मॅनेजर आणि एजंटाचा वाद झाला. त्या कारणातून दोघांनी संबंधित मॅनेजरचे राहत्या घरातून अपहरण करून लाकडी दांडक्याने मारहाण करत त्यांच्या मित्राकडे व घरच्यांकडे पाच लाखांच्या खंडणीची मागणी केली. घटनेची माहिती मिळताच अलंकार पोलिसांनी 24 तासात दोघा आरोपींना अटक केली.
ईशान अरविंद कदम (वय 31, रा. वारजे), सौरभ सुनिल गोरे (वय 30, रा. उंड्री) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत अपहृत मॅनेजरच्या मित्राने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपहृत मॅनेजर हे एका नामांकित फायनान्स कंपनीचे पुणे शहर फायनान्स मॅनेजर म्हणून काम पाहतात.
त्याचे इन्शुरन्स व्यवसायासंबंधाने एजंट ईशान कदम याच्यासोबत कमिशनच्या देवाणघेवाणीवरुन वाद होते. त्या वादातून 8 जून रोजी दुपारी 3 वाजता कदम याने गोरे याला बरोबर घेतले. मॅनेजरला घरी येऊन मारहाण करून गाडीतून त्याचे अपहरण केले. त्याच्या मित्राकडे व घरच्यांकडे 5 लाख रुपयांची मागणी केली. जर पैसे दिले नाही तर त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली.
आरोपींनी मॅनेजरला बाणेर – हिंजवडी रोडवरील एका हॉटेलमध्ये नेऊन बेदम मारहाण केली. त्यानंतर पुन्हा गाडीत घालून रावेत, उंड्री, डेक्कन या ठिकाणी नेले. रात्री डहाणूकर सर्कल येथील एका फ्लॅटवर डांबून ठेवले. या अपहरणाची माहिती मिळताच अलंकार पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र सहाणे व त्यांच्या पथकाने त्यांचा शोध सुरू केला. सुरुवातीला त्यांचे लोकेशन खेड शिवापूर भागात मिळाले. तेथे जाऊन शोध घेत असताना त्यांना पोलिस शोधात असल्याचे समजल्यावर त्यांनी दुस-या दिवशी 9 जून रोजी सकाळी मॅनेजर यांना कर्वे रोडवरील वनदेवी सिग्नलजवळ सोडून ते पळून गेले.
पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाद्वारे आरोपींचा शोध घेऊन दोघांना अटक केली. ही कामगिरी पोलिस उपायुक्त सुहेल शर्मा, सहायक
आयुक्त राजेंद्र गंलाडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र सहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सूर्यकांत सतपाळे, गणेश चव्हाण, पोलिस अंमलदार सिद्धराम कोळी, सोमेश्वर यादव, आशिष राठोड, धीरज पवार, निशीकांत सावंत, हरीश गायकवाड, नितीन राऊत, महेश निंबाळकर, योगेश झेंडे यांनी केली.
हेही वाचा