विसर्जन मार्गावरील बेवारस वाहने ‌’जैसे थे‌’; महापालिकेचा गणेशोत्सव तयारीचा दावा फोल 
पुणे

Ganesh Visarjan Route Issues: विसर्जन मार्गावरील बेवारस वाहने ‌’जैसे थे‌’; महापालिकेचा गणेशोत्सव तयारीचा दावा फोल

केबलही तशाच पडून; मिरवणुकीत ठरणार अडथळा

पुढारी वृत्तसेवा

Ganesh Visarjan route issues in Pune

पुणे: गणेश विसर्जन मिरवणुकीत येणार्‍या भाविकांना त्रास होऊ नये, यासाठी या मार्गावरील बेवारस वाहने तसेच मिरवणुकीत ऑप्टिकल फायबर केबलचा त्रास होऊ नये, यासाठी वाहने व केबल काढून टाकण्यात येतील, असा दावा महापालिकच्या अतिक्रमण आणि विद्युत विभागाने केला होता.

मात्र, विसर्जन मिरवणुकीला काही तास शिल्लक असताना देखील प्रत्यक्षात बेवारस वाहने व केबल तसेच असून, याचा परिणाम मिरवणुकीवर व नगरिकांवर होणार आहे. त्यामुळे महापालिकेने गणपती विसर्जनासाठी आवश्यक ती सर्व तयारी केल्याचा दावा फोल ठरला आहे. (Latest Pune News)

पुण्याच्या वैभवी गणेशोत्सवाची सांगता शनिवारी (दि.6) होत आहे. सर्व गणेश मंडळे विसर्जन मिरवणुकीच्या तयारीत गुंतली आहेत. रविवारी दुपारपर्यंत ही विसर्जन मिरवणूक चालणार आहे. ही मिरवणूक सुरळीत पार पडावी यासाठी महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन, विद्युत, पाणीपुरवठा, पथ, अग्निशामक दल या विविध विभागांनी क्षेत्रीय कार्यालयांच्या पातळीवर तयारी केली आहे.

विसर्जन मिरवणूक मार्गांवर अनेक बेवारस वाहने आहेत, तसेच ऑप्टिकल फायबर केबलचे जाळेदेखील मोठे आहे. दरवर्षी वाहने व केबल महापालिकेमार्फत काढली जातात. मात्र, यावर्षी टिळक रस्ता, शास्त्री रस्ता, केळकर रस्ता, कुमठेकर रस्ता आदी विसर्जन मार्गावरील केबल काढल्या नाहीत, या मार्गावरील बेवारस वाहनेदेखील तसेच आहेत.

यामुळे मंडळांच्या कार्यकर्त्यांनाच ही वाहने व केबल काढावे लागणार आहेत. शिवाजी रस्ता, खडकमाळ परिसर, महात्मा फुले मंडई आदी परिसरात बेवारस वाहने पडून आहेत. मिरवणुकीत त्यांचा अडसर होण्याची शक्यता आहे.

पुण्यातील स्वारगेट चौकात वैद्यकीय कक्ष उभारणे अपेक्षित आहे. येथे मोठी वर्दळ असल्याने नागरिकांना आरोग्य सेवा देणे पालिकेचे काम आहे. गुरुवारी स्वारगेट चौकात रुग्णवाहिका न मिळाल्याने एकाचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. असे असतानादेखील येथे वैद्यकीय कक्ष उभारण्यात आलेला नाही. तसेच ऑप्टिकल फायबर व बेवारस वाहने देखील पालिकेने उचलली नाहीत.
- ॠषिकेश बालगुडे, उत्सवप्रमुख खडक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
शहरातील मध्यवस्तीतील बेवारस वाहने विसर्जन मिरवणुकीपूर्वी उचलली आहेत. पार्क केलेली आढळलेली वाहने हटविण्यात आली आहेत. तर, काही वाहनांना नोटिसा लावल्या आहेत.
- संदीप खलाटे, उपायुक्त, अतिक्रमण विभाग, महापालिका.
प्रमुख विसर्जन मार्गांवरील मोठ्या ऑप्टिकल फायबर केबल काढल्या आहेत. एकच वाहन उपलब्ध असल्याने या कामास मर्यादा आहेत.
- मनीषा शेकटकर, मुख्य अभियंता, विद्युत विभाग, पुणे महापालिका.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT