‌Aaple Sarkar Portal Issue Pudhari
पुणे

Baramati Aaple Sarkar Portal Issue: ‘आपले सरकार’ पोर्टलच्या बिघाडामुळे विद्यार्थी-पालक हैराण

बारामतीत दाखले सेवांचा खोळंबा; सर्व्हर डाऊनमुळे महा ई-सेवा केंद्रांवर नागरिकांची गर्दी

पुढारी वृत्तसेवा

बारामती: शासनाच्या ‌‘आपले सरकार‌’ पोर्टलच्या सततच्या तांत्रिक बिघाडामुळे बारामती तालुक्यात विद्यार्थी, पालक आणि महा ई-सेवा केंद्रचालक हैराण झाले आहेत. शैक्षणिक दाखले, अर्ज पडताळणी, डिजिटल स्वाक्षरी यांसारख्या सेवा ठप्प झाल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. शासनाकडून डिजिटल महाराष्ट्राच्या घोषणा केल्या जात असल्या तरी प्रत्यक्षात मात्र पोर्टल वारंवार बंद पडत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे.

तब्बल आठवडाभर ‌‘तांत्रिक सुधारणा‌’च्या नावाखाली पोर्टल बंद ठेवण्यात आले होते. मात्र, पुन्हा सुरू झाल्यानंतरही यात कोणताही बदल झालेला नाही. काही काळासाठी सेवा सुरू झाल्या; पण सर्व्हर पुन्हा डाऊन झाल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. विशेष म्हणजे, पोर्टल बंद राहणार असल्याची कोणतीही पूर्वकल्पना ई-सेवा केंद्रचालकांना देण्यात येत नाही. दरवर्षी प्रवेशादरम्यान अशा अडचणींना पालकांना सामोरे जावे लागत आहे. सध्या बारावी आणि दहावीचा निकाल जाहीर झाला आहे.

जून-जुलै महिन्यातील प्रवेशप्रक्रियेसाठी जातीचे, उत्पन्नाचे, रहिवासी तसेच इतर शैक्षणिक दाखल्यांची गरज भासणार आहे. ही गर्दी लक्षात घेऊन अनेक पालकांनी मे महिन्यापासूनच दाखले काढण्यास सुरुवात केली आहे. मात्र, याच काळात पोर्टल कोलमडले आहे. दाखल्यांसाठी पालकांना उन्हातान्हात हेलपाटे मारावे लागत आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक काम रखडल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

अपडेटच्या नावाखाली नागरिकांची थट्टा सुरू आहे का? असा सवालही अनेक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. दरम्यान, शासनाच्या डिजिटल व्यवस्थेतील नियोजनाचा अभाव पुन्हा एकदा समोर आला आहे. वेबसाइट सातत्याने बंद राहणे आणि सर्व्हर डाऊन राहणे, हा प्रकार आता नित्याचा झाल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली.

शैक्षणिक प्रवेशाचा हंगाम तोंडावर असताना ‌’आपले सरकार‌’ पोर्टल तातडीने सुरळीत सुरू करून पर्यायी व्यवस्था उभी करावी. पोर्टल बंद असल्याने विद्यार्थी आणि पालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
प्रमोद पानसरे, अध्यक्ष, महा ई-सेवा केंद्र बारामती तालुका संघटना

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT