आळंदीत बुधवारपासून कार्तिकी वारी सोहळ्याला सुरुवात Pudhari
पुणे

Alandi Kartiki Wari 2025: आळंदीत बुधवारपासून कार्तिकी वारी सोहळ्याला सुरुवात

संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्याचा शुभारंभ हैबतबाबा पायरी पूजनाने; एकादशी ते समाधी दिनापर्यंत भक्तिमय कार्यक्रमांची रेलचेल

पुढारी वृत्तसेवा

आळंदी : आळंदी कार्तिकी वारी, संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यास बुधवार (दि. 12) पासून भक्तिमय वातावरणात गुरुवर्य हैबतबाबा पायरी पूजनाने प्रारंभ होणार आहे. या सोहळ्यातील कार्तिक एकादशीची मुख्य पहाट पूजा शनिवारी (दि. 15), तर माउलींचा संजीवन समाधी दिन सोहळा सोमवारी (दि. 17) साजरा होणार आहे. गेल्या वर्षाप्रमाणेच यंदादेखील त्रयोदशीचा योग दोन दिवस आला असून, दि. 17 व 18 रोजी त्रयोदशी आहे.(Latest Pune News)

कार्तिक एकादशी झाल्यानंतर द्वादशीच्या दिवशी खिरापत पूजा आणि तिसऱ्या दिवशी त्रयोदशी वारकरी परंपरेनुसार केली जाते. त्यामुळे परंपरेनुसार सोमवारी (दि. 17) त्रयोदशीच्या दिवशी माउलींचा संजीवन समाधी दिन सोहळा साजरा केला जाणार आहे. कार्तिकी वारीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह सोमवार (दि. 10) पासून सुरू होणार आहे.

कार्तिक एकादशीला शनिवारी (दि. 15) माउलींच्या संजीवन समाधीवरील पहाटपूजा 12 बह्मवृंदांच्या वेदघोषात प्रारंभ होईल. एकादशीला समाधी मंदिर दिवसभर भाविकांसाठी दर्शनासाठी खुले राहणार आहे. दुपारी 1 वाजता माउलींची पालखी नगरप्रदक्षिणेसाठी देऊळवाड्यातून बाहेर पडेल. यानंतर पालखी रात्री 9 वाजता मंदिरात परंपरेनुसार परतल्यानंतर मंदिर प्रदक्षिणा आणि त्यानंतर धुपारती होईल. द्वादशीनिमित्त रविवारी (दि. 16) प्रांताधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शासकीय पूजा पहाटे साडेतीनच्या सुमारास पार पडेल. दुपारी 4 वाजता परंपरेप्रमाणे रथोत्सवासाठी माउलींची पालखी देऊळवाड्यातून बाहेर पडेल.

समाधी सोहळादिनी सोमवारी (दि. 17) पहाटे 3 ते 4 वाजेदरम्यान प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ यांच्या हस्ते समाधीवर पवमान अभिषेक, दुधारती झाल्यावर मुख्य कार्यक्रमास सुरुवात होईल. सकाळी पाच ते साडेनऊ माउलींच्या चलपादुकांवर भाविकांच्या पूजा होतील. सकाळी 7 ते 9 महाद्वारात हैबतबाबांच्या पायरीपुढे कीर्तन, तर वीणामंडपातही कीर्तनाचा कार्यक्रम होईल. सकाळी 9 ते दुपारी 12 वाजेपर्यंत वीणामंडपामध्ये संत नामदेव महाराजांच्या वंशजांच्या माउलींच्या समाधी प्रसंगाचे कीर्तन होईल. दुपारी ठीक 12 वाजता संजीवन समाधी दिन साजरा होणार आहे. गुरुवारी (दि. 20) रात्री माउलींच्या पालखीची नगरप्रदक्षिणा आणि छबिना मिरवणुकीने कार्तिकी वारी सोहळ्याची सांगता होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT